सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता !
By Appasaheb.patil | Published: March 4, 2023 01:03 PM2023-03-04T13:03:43+5:302023-03-04T13:04:13+5:30
महसुली जमा व महसुली खर्चाच्या एकूण रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या सन २०२२-२३ चे सुधारीत व सन २०२३ - २४ च्या १ हजार ७५ कोटी १९ लाख ४ हजार ४०१ रुपयांच्या नियमित अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभा म्हणजेच प्रशासकांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शितल तेली उगले यांनी आज दिली.
सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे सुधारीत व सन २०२३ - २४ चे नियमित अंदाजपत्रक हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ अन्वये स्थायी समितीकडे मंजुरीसाठी त्यानंतर सर्वसाधारण सभेकडे मान्यतेस्तव शिफारस करण्यासाठी दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सादर करण्यात आलेले होते. त्यास स्थायी समिती ठराव क्र. १८९ दि. २३ फेब्रुवारी २०२३ अन्वये फेर बदलासह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९६ अन्वये सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी सादर केलेले आहे. त्यास सर्वसाधारण सभेने म्हणजेच प्रशासकांनी आज मान्यता दिली आहे.
महसुली जमा व महसुली खर्चाच्या एकूण रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे आयुक्तांनी सांगितले. परिवहन समिती यांनी सूचविलेल्या ५९ कोटी ३१ लाख ८२ हजार ६४१ रुपये (३५ बसेस) रुपये इतक्या एकूण जमा व खरच प्रशासकांनी मंजुरी दिली आहे, असेही महापालिका प्रशासक शितल तेली - उगले यांनी यावेळी सांगितले.