सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:29 PM2019-06-11T12:29:45+5:302019-06-11T12:32:48+5:30
जाणून घ्या कोणत्या शाखेला किती जागा उपलब्ध ?
सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होत आहे. शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी ही माहिती दिली. वालचंद महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अकरावी प्रवेशासाठीचे अर्ज हे १२ ते २४ जूनदरम्यान महाविद्यालयात देण्यात येणार आहेत. इंटरनेटवरुन काढण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार प्रवेश प्रक्रियेचे अर्ज देण्यात येणार आहेत. २४ ते २८ जूनदरम्यान भरलेले अर्ज महाविद्यालयात जमा करायचे आहेत. यावेळी दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत देणे गरजेचे आहे. २८ ते ३० जूनदरम्यान महाविद्यालयीनस्तरावर अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला सादर करायचा आहे.
दुसरी गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलैदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे. जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आहे. तिसºया गुणवत्ता यादीनुसार ११ ते १३ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
महाविद्यालयीनस्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ जुलैला समाप्त करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून महाविद्यालये नियमितपणे सुरु होणार आहेत. प्राचार्यांच्या अधिकारात असलेल्या रिक्त जागांवरील प्रवेश हे २५ जुलैपर्यंत सुरु असणार आहेत.
शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवेश घेताना अडचण येणार नाही. मात्र यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी विशिष्ट अशा महाविद्यालयातच प्रवेश घेण्याचा हट्ट सोडायला हवा. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस शिक्षण उपनिरीक्षक मिलिंद मोरे, वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय शहा, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील शाखानिहाय उपलब्ध जागा
- - कला - २८ हजार ६८०
- - विज्ञान - २० हजार ९६०
- - वाणिज्य - ६ हजार ९६०
- - संयुक्त शाखा - २ हजार ४४०
- - एकूण जागा - ५९ हजार ४०
- - उत्तीर्ण विद्यार्थी संख्या - ५२ हजार ५९६