गणेशोत्सव, दिवाळीतलं ॲडव्हान्स बुकिंग; मुंबई, पुणे, हैदराबाद मार्गावरील रेल्वेचं तिकीट वेटिंग

By Appasaheb.patil | Published: August 28, 2022 06:27 PM2022-08-28T18:27:55+5:302022-08-28T18:28:07+5:30

रेल्वेचा प्रवास सुसाट; विजेवर धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचतोय

Advance booking for Ganeshotsav, Diwali; Railway ticket waiting on Mumbai, Pune, Hyderabad route | गणेशोत्सव, दिवाळीतलं ॲडव्हान्स बुकिंग; मुंबई, पुणे, हैदराबाद मार्गावरील रेल्वेचं तिकीट वेटिंग

गणेशोत्सव, दिवाळीतलं ॲडव्हान्स बुकिंग; मुंबई, पुणे, हैदराबाद मार्गावरील रेल्वेचं तिकीट वेटिंग

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सध्या सण, उत्सवाचा काळ आहे. या काळात शाळा, शासकीय नोकरदार व अन्य लोकांना सुट्टी मिळते. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमधील या सुट्टीच्या काळात प्रवासाचे नियोजन करून हजारो रेल्वे प्रवाशांनी आतापासूनच रेल्वेचं तिकीट बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद मार्गांसह अन्य मार्गांवरील तिकिटाचा चार्ट वेटिंग दाखवित आहे.

कोरोनानंतर रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर आली. कमी खर्चात जास्त अंतराचा प्रवास करण्यासाठी अनेक लोक रेल्वेनं प्रवास करतात. त्यातच सण, उत्सवाचा काळ असल्याने सलग सुट्ट्या मिळतात. या सुट्ट्यांचा फायदा घेत अनेक लोक नोकरीच्या ठिकाणाहून मूळ गावी जाणे, धार्मिकस्थळांना भेटी देण्याबरोबरच विविध ठिकाणी पर्यटन करण्याचे नियोजन करतात. या नियोजनात बहुतांश लोक रेल्वेनं प्रवास करण्याचे नियोजन करतात. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमधील तिकिटाचे बुकिंग लोक आतापासूनच करू लागले आहेत.

---------

सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या

  • - सिद्धेश्वर एक्स्प्रेस
  • - कोणार्क एक्स्प्रेस
  • - मुंबई एक्स्प्रेस
  • - उद्यान एक्स्प्रेस
  • - नागरकोईल एक्स्प्रेस
  • - गदग एक्स्प्रेस
  • - विशाखापट्टणम एक्स्प्रेस
  • - हुसेनसागर एक्स्प्रेस
  • - एलटीटी एक्स्प्रेस

---------

रेल्वे गाड्यांची आकडेवारी

  • सोलापूर विभागात सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
  • ११९
  • एकूण फेऱ्या
  • २३८
  • मेल/ एक्स्प्रेस
  • २७
  • पॅसेंजर
  • १५

-----------

पॅसेंजर अन् डेमू गाड्या वाढतील ?

दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या झालेल्या कामामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आता पॅसेंजर व डेमू गाड्या वाढणार आहेत. शिवाय पंढरपूर, कोल्हापूर, हैदराबाद, दौंड, विजापूर, गुलबर्गा आदी मार्गांवर गाड्या वाढतील, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

----------

सर्वच गाड्या विजेवर लागल्या धावू

सोलापूर विभागात झालेले दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे विभागातील सर्वच मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या विजेवर धावत आहेत. त्यामुळे कमी वेळेत जास्तीचे अंतर पार होत असल्याने प्रवाशांचा प्रवासाचा ३० ते ४० मिनिटांचा वेळ वाचत आहे. त्यामुळे खासगी गाड्यांपेक्षा रेल्वे प्रवासाला प्रवासी प्राधान्य देत आहेत.

--------

पार्सलमधून उत्पन्न वाढण्यावर भर

प्रवासी रेल्वे गाड्यांतून रेल्वेचं उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पार्सल गाड्यांच्या माध्यमातून मिळणारे रेल्वेचं उत्पन्न कमी आहे, ते आता अधिक वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न होणार आहेत. किसान रेल्वे चालू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल.

- एल. के. रणयेवले, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, सोलापूर मंडल.

-------

मालवाहतूक गाड्यांचाही वेग वाढेल

सर्वच गाड्या विजेवर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ ३० ते ४० मिनिटे वाचणार आहे. एवढेच नव्हे तर मालवाहतूक गाड्यांचाही ताशी वेग वाढणार आहे. सोलापूर विभागात रेल्वे क्रॉसिंगला थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ परिचलन व्यवस्थापक, सोलापूर मंडल.

Web Title: Advance booking for Ganeshotsav, Diwali; Railway ticket waiting on Mumbai, Pune, Hyderabad route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.