सोलापुर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या काळ्या कोटाला वकिलांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:12 PM2018-10-24T13:12:08+5:302018-10-24T13:13:43+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देणार निवेदन : तालुका पातळीवरील बार असोसिएशनसह सोलापुरातही होणार चर्चा
सोलापूर : झेडपी शिक्षकांना केंद्रशाळेने ठरविलेल्या ड्रेसकोडबरोबरच्या काळ्या रंगाच्या ब्लेझरला बार असोसिएशनने विरोध केला आहे. काळा कोट ही वकिलांची ओळख असून, ती इतरांना सारखी राहू नये, असा विचार करण्यात आला आहे.
दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाºया शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षकांना ब्लेझरसह वर्गावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. शहर व जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. सर्वांना जर काळ्या रंगाचा ड्रेसकोड झाला तर वकिील आणि शिक्षकांमध्ये फरक जाणवणार नाही. नावलौकिक असलेला व्यवसाय म्हणून वकिलांची ओळख आहे. सर्व जण काळा कोट वापरू लागले तर वकिलांची वेगळी ओळख राहणार नाही. त्यामुळे हा ड्रेसकोड बदलण्यात यावा, अन्यथा त्याचा रंग बदलावा, अशी चर्चा सध्या वकील मंडळींमधून होत आहे.
काळ्या रंगाचा इतिहास...
- - ब्रिटिश काळात न्यायाधीश आणि वकील हे काळा गाऊन घालत होते. एकप्रकारची गंभीरता आणि रहस्यमय प्रवृत्तीची छाप दिसावी, हा त्याच्यामागे एक हेतू आहे. काळा रंग त्यांचा उच्चभू्र दर्जा दर्शवतो. हा काळा रंग नि:पक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतीक समजला जातो. न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो.
- - भारतात १९६१ च्या अॅडव्होकेट अॅक्टनुसार देशातल्या सर्व न्यायालयातील वकिलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात.
काळा कोट ही वकिलाची ओळख आहे, ती इतर ठिकाणी समान होऊ नये. शहरात १२०० तर जिल्ह्यात तालुका पातळीवर १८०० वकील मंडळी काळा ब्लेझर परिधान करून न्यायालयीन कामकाज पाहतात. यावर बार असोसिएशनची बैठक बोलावून चर्चा केली जाणार आहे. निर्णय घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार आहोत.
- अॅड. संतोष न्हावकर, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर.