१२ तासानंतर पंढरपुरातील रुक्मिणी मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:54 AM2022-06-13T10:54:58+5:302022-06-13T10:55:17+5:30
मूर्तीवर काळजीपूर्वक नित्यपोचार : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया
पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शनिवारी रात्री ११ वाजता लेपण प्रक्रियेला सुरुवात झाली. रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण झाली. या प्रक्रियेला जवळपास १२ तास लागले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही वज्रलेपण प्रक्रिया पार पडली.
पुढील दोन दिवस रुक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्शदर्शन बंद राहणार आहे. रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येऊन मूर्तीची पाहणी केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री मूर्तीच्या चरणावर वज्रलेपण प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये रुक्मिणी मातेच्या चरणावर इफोक्सीचा सिलिकॉन लेप करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
---
रुक्मिणी मातेची मूर्ती शालिग्राम दगडाची आहे. या मूर्तीवर वज्रलेप दोन ते चार वर्षेच टिकतो. सध्या इफोक्सीचे सिलिकॉन लेपण करण्यात आले आहे. पदस्पर्शदर्शन, मूर्तीला होणारे नित्योपचार पाणी, दही, दूध, मध याचे प्रमाण मंदिर समितीने कमी करून नित्यपचार करावेत. रुक्मिणी मातेच्या चरणावर केलेला वज्रलेप जास्त दिवस राहील. मंदिर समितीच्या कर्मचारी पुजारी व्यक्तीने रुक्मिणी मातेच्या चरणाला कोणत्याही प्रकारची इजा, धका लागू नये याची काळजी घ्यायची आहे.
-श्रीकांत मिश्रा, भारतीय पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद