२३ दिवसांच्या उपचारानंतर गव्हाणी घुबडाची निसर्गात झेप
By appasaheb.patil | Published: February 22, 2020 10:30 AM2020-02-22T10:30:54+5:302020-02-22T10:57:42+5:30
वन्यजीवप्रेमी संस्थेची मदत; अॅनिमल राहतने केले यशस्वी उपचार
सोलापूर : भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांत राहणाºया जखमी गव्हाणी घुबडावर वन्यजीवप्रेमींच्या मदतीने अॅनिमल राहतने यशस्वी उपचार केले़ तब्बल २३ दिवसांच्या उपचारानंतर या घुबडाला १७ फेबु्रवारी रोजी किल्ला बाग परिसरातून निसर्गात सोडण्यात आले.
गव्हाणी घुबड हा संपूर्ण भारतभर तसेच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांसह जवळजवळ संपूर्ण जगभर आढळणारा पक्षी आहे. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. हे पक्षी एकट्याने किंवा जोडीने जुन्या इमारतीत, किल्ले, कडेकपारीत, शेतीचे प्रदेश येथे राहणे पसंत करतात.
दरम्यान, २६ जानेवारी रोजी वन्यजीवप्रेमी प्रवीण जेऊरे यास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला़ एक घुबड किल्ला बाग परिसरात अर्धमेल्या अवस्थेत पडले आहे, असे मोबाईलवरून सांगण्यात आले़ या घटनेची माहिती मिळताच प्रवीण जेऊरे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले़ जेऊरे यांनी घटनास्थळाची पाहणी करता गव्हाणी घुबडाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले़ त्याच्या अंगावर पूर्णपणे किडे होते़ पुढील उपचारासाठी त्यास अॅनिमल राहतकडे नेण्यात आले. त्यानंतर राहतचे डॉ़ आकाश जाधव यांनी उपचार केले. उपचारादरम्यान रोज घुबडास फ्रेश मांस देण्यात येत होते. २३ दिवसांच्या संगोपनानंतर १७ फेब्रुवारी रोजी त्याच किल्ला बाग परिसरात गव्हाणी घुबडास निसर्गात मुक्त करण्यात आले.
आकाशात झेप...
- गव्हाणी घुबडास निसर्गात मुक्त करताच घुबडाने आकाशात झेप घेतली व समोरील झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. थोडा वेळ फांदीवर बसून नंतर तो तेथून झेपावला व अंधारात दिसेनासा झाला. याप्रसंगी सोलापूर वनविभागाचे सहायक प्रमुख नागटिळक, वनपाल चेतन नलावडे, किल्ला बाग समन्वयक कांबळे, अॅनिमल राहतचे आनंद बिराजदार, प्रवीण जेऊरे, मुकुंद शेटे व वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.