३८ दिवसांनंतर सोलापुरात पेट्रोल ८९ तर डिझेलचा भाव ७५ रुपये प्रतिलिटर
By Appasaheb.patil | Published: November 26, 2020 03:41 PM2020-11-26T15:41:49+5:302020-11-26T15:43:32+5:30
१ रुपये २५ पैशांची झाली वाढ - क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम
सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली होती, त्यावेळी पेट्रोल अन् डिझेलचे भावही स्थिर होते. आता राज्यात सर्वच खुले झाल्याने सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सोलापुरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत १ रुपये २५ पैशांची वाढ झाल्याची माहिती पेट्रोल असोसिएशनने दिली.
डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात वाढ झाली. तेलाचा भाव ०.९८ टक्क्यांनी वाढ घेत ते ४८.३८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावला. साथीच्या आजाराचे वाढते परिणाम आणि लिबियातील तेल उत्पादनात वृद्धी झाल्याने तेलाच्या दरांवर परिणाम झाला. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोविड रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानेही तेलाचे दर वाढल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय लिबियातील क्रूड उत्पादनातील वाढीमुळे तेलाच्या दरांवर परिणाम झाला.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव, चलन विनिमय दर आणि आयातीचा खर्च या सर्व आघाडींवर तडजोड करत पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवले होते; मात्र आता सर्व काही सुरळीत सुरू झाल्याने पेट्रोल कंपन्यांनी दरात वाढ केली आहे.
-------------
का वाढले दर...
अनलॉकनंतर रस्त्यावर गाड्यांची संख्या वाढल्याने डिझेलची विक्रीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या देखील काही प्रमाणात सुखावल्या आहेत. इंधन मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे पेट्रोल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. क्रूडतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे.
आता कुठे सुरळीत सुरू आहे असे म्हणेपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचण असताना त्यात आता महागाईची भर पडत आहे हे सर्वांचेच दुदैव आहे, असे म्हणावे लागेल.
- रमेश सुरवसे, वाहनधारक, सोलापूर