तब्बल ४५ वर्षांनी २७ मिळकतींच्या ‘सात-बारा’वर लागले सोलापूर महापालिकेचे नाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:14 PM2018-12-13T12:14:59+5:302018-12-13T12:15:55+5:30
मनपा आयुक्तांनी घेतली मोहीम : ६०० कोटींचा फायदा झाल्याचा दावा
राकेश कदम
सोलापूर : शहर नगररचना योजनेतून १९७३ झाली ५२ मिळकती महापालिकेला मिळाल्या होत्या. यातील २७ मिळकतींच्या सातबारा उताºयावर तब्बल ४५ वर्षांनी महापालिकेचे नाव लागले आहे. पुढील महिन्यात उर्वरित २५ मिळकती महापालिकेच्या ताब्यात येतील. ही जवळपास ६०० कोटींची मालमत्ता असल्याचा दावा मनपाच्या भूमी व मालमत्ता विभागाने केला आहे.
सोलापूर शहर नगररचना योजना क्र. ४ ही विभागीय विकास सरकारी योजना १० आॅक्टोबर १९७३ साली मंजूर झाली होती. १ डिसेंबर १९७३ पासून हा आराखडा अंमलात आला. यावेळी शहरातील अनेक जागा महापालिकेला बक्षीसपत्र म्हणून मिळाल्या. यातील ५२ जागांच्या सातबारा उताºयांवर महापालिकेचे नाव लागलेले नव्हते. याचा फायदा घेऊन मिळकतदारांच्या पुढील पिढीने या जागा विक्री करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये स्मशानभूमी, शाळांसाठी आरक्षित असलेल्या जागांचाही समावेश होता.
वर्षभरापूर्वी जुळे सोलापुरात शाळेसाठी आरक्षित असलेली जागा परत मिळावी, असा अर्ज महापालिकेला सादर करण्यात आला होता. सात महिन्यांपूर्वी हे प्रकरण मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे आले. त्यांनी मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर ही जागा महापालिकेला बक्षीसपत्र म्हणून देण्यात आल्याचे लक्षात आले. आयुक्तांनी भूमी व मालमत्ता विभाग आणि सहायक नगररचना विभागाला अशा बक्षीसपत्र जागांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. भूमी व मालमत्ता विभागाने एकूण ५२ जागांची यादी सादर केली.
याबाबत अहवाल तयार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यात विलंब झाला. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली.
निवृत्त अधिकाºयाकडून घेतले सहकार्य
- या संपूर्ण प्रकरणाची माहिती नगर भूमापन कार्यालयातून निवृत्त झालेले सिद्राम तुपदोळकर यांना होती. त्यामुळे त्यांची मदत घेण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. ढाकणे यांनी घेतला. तुपदोळकर आणि भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांनी जुनी कब्जा पावती शोधणे, मोजणी नकाशे आणि टीपी चारचे नकाशे शोधून प्रत्येक मिळकतीचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आला. आयुक्तांच्या सहीने तो जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला.
महापालिकेने या जागांबाबत सुरू केली कार्यवाही
- फॅसिलिटी सेंटर, तुळजापूर रोड नाका, साईट फॉर टान्नूरी, फायर ब्रिगेड, कम्युनिटी फॅसिलिटी सेंटर, जकात नाका, स्टोअर डिस्पेन्सरी अँड लायब्ररी, बार्शी रोड नाका, स्कूल अँड प्ले ग्राऊंड, कारंबा स्मशानभूमी, पुणे रोड नाका, हिंदू स्मशानभूमी, प्लॉट नं. १०६ येथील शाळा आरक्षित जागा, हिरज रोड नाका, प्लॉट नं. १३५ प्ले ग्राऊंड आरक्षण, प्लॉट नं. १३६ मार्केट, दक्षिण मध्य रेल्वे नाका, म्युनिसीपल सब आॅफिस, वांगी रोड नाका, ख्रिश्चन स्मशानभूमी, इंडियन ख्र्रिस्त स्मशानभूमी, बाहाई स्मशानभूमी, विजापूर रोड नाका, कंबर तलाव.
टीपी ४ मधील २७ मिळकती अर्थात ११० एकर जागा आता प्रत्यक्षात महापालिकेच्या मालकीची झाली आहे. उर्वरित २५ मिळकतीही ताब्यात येतील. आज ही प्रक्रिया झाली नसती तर उद्या ती इतरांच्या ताब्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कंबर तलावाच्या उताºयावर मनपाचे नाव नसल्याने शासनाकडे एखादा प्रस्ताव पाठवायचा म्हटले तरी अडचण यायची. अशा इतर जागांवरील अडचणी आता दूर होत आहेत. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यामुळे सोलापूर महापालिकेला जवळपास ६०० कोटी रुपयांचा फायदा झाला असे म्हणता येईल.