गॅस सिलिंडरसाठी सहाशे रुपये मोजल्यानंतर मिळते सव्वा रुपयाची सबसिडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:34+5:302020-12-05T04:43:34+5:30
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ७ लाख २९ हजार १०१ गॅस सिलिंडर धारक आहेत. जिल्ह्यात एकूण ९० गॅस वितरक आहेत. ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ७ लाख २९ हजार १०१ गॅस सिलिंडर धारक आहेत. जिल्ह्यात एकूण ९० गॅस वितरक आहेत. सिलिंडरसाठी ग्राहकांना ६०२ रुपये मोजावे लागतात. घरपोच सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला ६०२ रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात महिनाअखेर १ रुपये ३४ पैशांची सबसिडी जमा होते. ही सबसिडी तुटपुंजी आहे, अशी तक्रार ग्राहक करतायेत.
घरपोच सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. सिलिंडर घरपोच दिल्यानंतर मॅडम...चहा-पाण्यासाठी पैसे द्याल का?, अशी अपेक्षा पुरवठादार करतात. काही पुरवठादार हक्काने पैसे वसूल करतात. याबाबत भारत पेट्रोलियम कंपनीचे जिल्हा समन्वयक राजीव कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. एक्स्ट्रा पैसे वसुली संदर्भात सोलापूर गॅस संघटनेकडून देखील अनेकदा प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे. याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. तरी एक्स्ट्रा पैसे वसुलीला खीळ बसली नाही.
चौकट
वितरकांना नोटिसा
एक्स्ट्रा पैसे वसुली संदर्भात आमच्याकडे तक्रारी येतात. आलेल्या तक्रारीनुसार आम्ही संबंधित वितरकांना कारणे दाखवा नोटीस देतो. तक्रारीत तथ्य आढळल्यास वितरकांवर आम्ही दंडात्मक कारवाई देखील करतो. आतापर्यंत दोन वितरकांवर कारवाई केलेली आहे. अजून कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी बिनधास्त तक्रार करावी.
राजीव कुमार
जिल्हा समन्वयक : भारत पेट्रोलियम कंपनी
...........
कोट
गॅस वितरकाकडून मिळालेल्या पावतीनुसार पैसे द्या. कुणी एक्स्ट्रा पैसे मागत असेल तर पावती मागे ग्राहक संपर्क नंबर आहे, त्या नंबरवर फोन करून तक्रार देऊ शकता. ग्राहकांनी जागरूक राहून तक्रार नोंदवावे. एक्स्ट्रा पैसे कोणी देऊ नयेत.
रवींद्र जोगीपेठकर
सोलापूर गॅस संघटना