मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही पालकमंत्री, सहकारमंत्री गटाचा वाद सोलापूरात सुरूच, महापालिकेच्या सभागृहात सुचना दोघांनी वाचली, सभागृह नेता वाद कायम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:13 PM2018-02-12T13:13:52+5:302018-02-12T13:15:14+5:30
सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : सोलापूर महानगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यातील तहकुब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी झाली़ सभा सुरू झाल्यानंतर सुचना नागेश वल्याळ व श्रीनिवास रिकमल्ले या दोघांनी एकत्रितपणे वाचण्यास सुरूवात केली़ याला विरोधी पक्षाचे आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे यांनी हरकत घेतली़ प्रभारी सभागृहनेता कोण आहे, सुचना दोन्हीजण एकाच वेळी कसे वाचन करीत आहेत, यावर गोंधळ सुरू झाला़ महापौर शोभा बनशेट्टी यांनी नागेश वल्याळ यांनी सुचना वाचावी असे आदेश दिले़ त्यावर उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह पालकमंत्री गटाचे सर्वच सदस्य सभागृहाबाहेर पडले़ गोंधळातच वल्याळ यांनी सुचना मांडल्या़ त्यावर चेतन नरोटे यांनी सभागृहात कोरम आहे का असा प्रश्न उपस्थित केला़ या गोंधळातच राजकुमार हंचाटे यांनी उपसुचना वाचली़ त्यामुळे विरोधी सदस्य गोंधळ करू लागले़ या गोंधळातच महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर केल्याचे घोषित करून सभा तहकुब केली़
यानंतर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, एमआयएमचे तौफिक शेख यांनी महापौर बनशेट्टी यांनी भेट घेतली़ शहराच्या विकासासाठी तुम्हाला आम्ही मदत करतो पण यापुढे सभागृहाचे कामकाज चालवा, वर्षभरात आमची एकही कामे झालेली नाहीत, यापुढे जर असेच झाले तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिका बरखास्त करण्याबाबत पाठपुरावा करू असा इशारा दिला़
------------------
खोटे बोल पण रेटून बोल........
प्रभारी सभागृहनेता कोण याबाबत पार्टी मिटींगमध्ये चर्चा झाली का अशी विचारणा केल्यावर महापौर बनशेट्टी म्हणाल्या की, शहराध्यक्षांना याबाबत पत्र दिले आहे, त्यांच्याकडून कोणाचेच नाव आले नाही, मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे पालकमंत्र्याच्या अधिपत्याखाली समिती अद्याप गठीत झालेली नाही त्यामुळे माझ्या अधिकारात वल्याळ यांना बोलण्यास परवानगी दिली़ ते कायमचे सभागृहनेते नाहीत़ पार्टी मिटिंगमध्ये रिकमल्ले यांचे नाव ठरले असे खोटे पण रेटून सांगितले जात आहे मला याबाबत कोणीही बोलले नाही़ उपमहापौर बत्तुल व इतर सदस्यांनी पालकमंत्री गटाचे रिकमल्ले यांचे नाव सुचविले असे सांगितले़ एकुणच प्रभारी सभागृहनेता पदाचा वाद कायम आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन सहकारमंत्री व पालकमंत्री गटात मनोमिलन झालेले दिसून येत नाही़