सोलापुरातून आल्याने शेजाºयांनी हाकलले.. ‘ती’ च्या मदतीला पोलीस धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 01:15 PM2020-06-11T13:15:48+5:302020-06-11T13:17:53+5:30
पंढरपुरात महिलेला विदारक अनुभव: खाकी वर्दीने केली तनपुरे मठात राहण्याची सोय
सचिन कांबळे
पंढरपूर : सोलापूर शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. यामुळे सोलापूर शहरातून ग्रामीण भागामध्ये येणाºया नागरिकांकडे संशयाने पाहण्याची वृत्ती वाढली आहे. सोलापुरातून पंढरपुरात आलेल्या एका महिलेला ती राहत असलेल्या परिसरातील नागरिकांनी तिच्या घरात प्रवेश करु दिला नाही; मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिची राहण्याची सोय एका मठामध्ये केली आहे. यामुळे ज्यांना कोणी नाही, त्यांना प्रशासन आहे, अशी प्रचिती या निमित्ताने आली.
पंढरपुरातील एक ४८ वर्षीय महिला सोलापूर येथे गेली होती. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून सोलापुरातच अडकून पडली होती. वाहनाची सोय होताच, ती पंढरपूरला परतली. शहरात आल्यानंतर तिने उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी करुन घेतली. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांनी तिला घरी अलगीकरणात राहण्यास सांगितले.
ती घरी जात होती. यावेळी घराजवळील नागरिक जमले, त्यांनी तिला त्या ठिकाणी राहण्यास विरोध केला. त्याचबरोबर काहीजण तिच्यावर चवताळून आले. नेमके याचवेळी त्या परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस हवालदार अरुण रासकर व सतीश सर्वगोड यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले. यानंतर संबंधित महिलेची चौकशी केली. मात्र ती रेड झोन भागातून आल्याने तिला राहू देण्यास कोणी तयार होत नसल्याचे लक्षात आले.
त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी डॉ. सागर कवडे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी संबंधित महिलेला श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये राहण्याची सोय केली. त्याठिकाणी तिला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिच्या जेवणाची देखील सोय करण्यात आली आहे. त्या महिलेला स्वत:चे घर असूनही तिच्यावर मठामध्ये राहण्याची वेळ आली आहे. यामुळे ज्याला कोणी नाही. त्याला प्रशासन आहे, असे दिसून आले.
पोलिसांच्या मदतीने डोळे पाणावले
- सोलापूरहून पंढरपुरात आलेल्या महिलेला तिच्या घरी राहण्यास परिसरातील नागरिक विरोध करत असल्याचे पाहून पोलीस तिच्या मदतीला धाऊन आले. तिला श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये नेऊन तेथे तिची सोय केली. त्याचबरोबर तिच्या नातेवाईकांना बोलावून तिला दररोज जेवणाची सोय करा, अशा सूचना दिल्या. या खाकी वर्दीतील माणुसकीमुळे त्या महिलेचे डोळे पाणावले.
मुंबई, ठाणे, पुणे व सोलापूर अशा रेड झोन भागातून नागरिक आल्यास आजूबाजूचे नागरिक घाबरत आहेत. नागरिकांनी चिंतीत न होता प्रशासनाला कळवावे. बाहेरुन आलेल्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर