अटी, शर्ती पूर्ण करूनही मुद्रा योजनेतून कर्ज मिळेना, दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू, अकलूजमधील उद्योजकाचे स्टेट बँकेसमोर आमरण उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:34 PM2018-01-24T12:34:11+5:302018-01-24T12:35:12+5:30
पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अकलूज दि २४ : मुद्रा कर्ज योजनेसाठी बॅँक अटी व शर्ती पूर्ण करुनही स्टेट बॅँक आॅफ इंडिया अकलूज शाखेच्या व्यवस्थापकांनी गत दोन वर्षे कर्ज न दिल्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे सुडबुध्दीने आकसापोटी बॅँक व्यवस्थापकांनी घेतलेल्या अन्यायकारक निर्णयामुळे मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीने ग्रासलेल्या सुनील निवृत्ती माने यांनी अखेर आज बॅँकेसमोरच आमरण उपोषणाला आरंभ केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी युवकांनी उद्योग-व्यवसाय करावा म्हणून महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजना राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून सुरु केली. परंतु या योजनेला बॅँकांनी अटी व शर्तीचे नियम दाखवून मुद्रा कर्ज योजनेचा बोजवारा उडविला आहे.
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत उद्योग करु इच्छिणारे अकलूज येथील हनुमान तालीम जवळ राहणारे सुनील माने यांनी स्टेट बॅँक आॅफ इंंडिया अकलूज शाखेकडे गत दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१५ साली मुद्रा कर्ज योजनेंतर्गत उद्योगासाठी कर्ज मागणी केली होती. याबाबत बॅँकेला सादर केलेल्या प्रकरणात १० लाख कर्ज (७५ टक्के) व स्वत:ची गुंतवणूक ३ लाख ४६ हजार ५९१ रूपये (२५ टक्के) असा प्रकल्प सादर केला होता. त्यानंंतर दोन वर्षे कर्जाबाबत सर्व अटी व शर्तींची पूर्तता करुनही बॅँक व्यवस्थापकांनी कर्ज न दिल्याने सुनील माने यांनी स्टेट बॅँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
दरम्यानच्या काळात दोन शाखा व्यवस्थापक बदलून गेले. त्यावर नव्याने दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या व्यवस्थापकांनी १४ डिसेंबर २०१७ रोजी कर्मचाºयांसह पडताळणीसाठी येऊन प्रकरणात व व्यवसाय जागेत सुधारणा करण्याचे सुचविले. त्यानुसार सुनील माने यांनी बदल केले व स्वत:चे ४ लाख ४१ हजार रूपये खर्चून गुुंतवणूक केली. तरीही मागणी व दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्ज मंंजूर न करता केवळ ४ लाख देतो असे सांगून मोदी साहेबांची मेहरबानी मिळतंय तेवढं घ्या, असे म्हणाले.
त्यामुळे सुनील माने यांच्या वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीमुळे बॅँक व्यवस्थापकांनी सुडबुध्दीने व आकसापोटी अन्यायकारक निर्णय घेतल्याच्या विरोधात माने यांनी उपोषण सुरु केले आहे.