कोरोनाग्रस्ताच्या निधनानंतर कुटुंबीयांचे सांत्वन झाले दुरापास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:15+5:302021-04-20T04:23:15+5:30
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून मृत्युदरही वाढला आहे. वृद्ध व ज्येष्ठांबरोबर तरुणही बळी पडत आहेत. वृद्धापकाळाने, काहींचा अल्प, तसेच ...
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून मृत्युदरही वाढला आहे. वृद्ध व ज्येष्ठांबरोबर तरुणही बळी पडत आहेत.
वृद्धापकाळाने, काहींचा अल्प, तसेच दीर्घ आजाराने, तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुटुंबीयांचे दुःख हलके करण्यासाठी, तसेच त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन, दशक्रिया अशा कोणत्याच विधीला उपस्थित राहण्यास मर्यादा पडत आहेत. इच्छा व ओढ असूनही केवळ कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून येण्या-जाण्यास प्रतिबंध घातला जात आहे.
कोरोनाची बाधा होऊ नये, कोरोनाचा वाहक, माध्यम बनू नये, या उद्देशाने कुणीही सांत्वनाला येऊ नये, असे संदेश सोशल मीडियावर टाकले जात आहेत. यामुळे इच्छा असली, तरी जवळचे नातेवाईक येऊ शकत नाहीत, अशी शोकांतिका पीडित कुटुंबांवर ओढावली आहे.
माणुसकीच्या भिंती पडल्या ओस
एखादी दुःखद घटना घडल्यावर आधार देण्यासाठी नातेवाईक, आप्तेष्ट, सगे-सोयरे यांना उपस्थित राहता येत नसल्याने, त्या कुटुंबाला स्वतःलाच स्वत:च्या मनाची समजूत काढून दुःख हलके करण्याची वेळ आली आहे. यामुळे माणुसकीच्या भिंतीही ओस पडल्याचे सध्या दिसून येत आहे.