दिवाळीनंतर सोलापुरात लसीकरणात झाली वाढ; घरोघरी देत आहेत डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 11:41 AM2021-11-09T11:41:01+5:302021-11-09T11:41:08+5:30
घरोघरी दिले डोस : ३० लाखाचा टप्पा पूर्ण होणार
सोलापूर : दिवाळीमुळे कमी झालेले लसीकरण पुन्हा वाढू लागले आहे. सोमवारी ११ हजार ६४७ जणांना डोस देण्यात आले. लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता घरोघरी जाऊन डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दिवाळीमुळे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील दररोजचे लसीकरण पाच हजारावर आले होते. सणामुळे लस घेण्याकडे लोक कानाडोळा करीत असल्याचे दिसून आले होते. भाऊबीज झाल्यानंतर पुन्हा लोक लसीकरणाकडे वळले आहेत. पहिला डोस न घेतलेल्यांसाठी आरोग्य विभागातर्फे घरोघरी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे सोमवारी ग्रामीणमध्ये ८ हजार २५६ तर शहरात ३ हजार ३९१ जणांनी डोस घेतला. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ हजार ६२ इतकी आहे. अशाप्रकारे पहिला डोस २२ लाख ६५ हजार ५३५ जणांनी तर दुसरा डोस ७ लाख ३ हजार ३१९ जणांनी घेतला आहे. जिल्ह्याचे एकूण लसीकरण २९ लाख ६८ हजार ८५४ इतके झाले आहे. आता दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे मोहिमेत दुसरा डोस घेणाऱ्यांचेही प्रमाण वाढविण्यात येणार असल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
१६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. दहा महिन्यात २३ हजार ३२९ सत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यातील २० हजार ६०२ सत्र झाली आहेत. ८८ टक्के सत्र पूर्ण झाली आहेत. सध्या शहरात ४० तर ग्रामीणमध्ये ११३ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. या केंद्रांतर्गत येणाऱ्या विभागात घरोघरी जाऊन राहिलेल्या लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे.
तीन लाख डोस शिल्लक
जिल्हा आरोग्य विभागाकडे सोमवारअखेर दीड लाख डोस शिल्लक आहेत. आरोग्य उपसंचालकांकडून मंगळवारी दीड लाख डोस नेण्याबाबत निरोप आला आहे. अशाप्रकारे आरोग्य विभागाकडे तीन लाख डोस शिल्लक आहेत. या आठवड्यात दररोज किमान ५० हजार लसीकरण व्हावे, असे नियोजन सुरू आहे. पण लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावर हे यश अवलंबून असल्याचे सांगण्यात आले.