चार वर्षांच्या पायपिटीनंतर ‘विकास’ विसावला आई-वडिलांच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:31+5:302021-04-27T04:22:31+5:30
माळशिरस : अनेक चित्रपटांच्या कथानकामध्ये आपल्या कुटुंबापासून अलग झालेल्या पात्रांचे रंजक कथानक पाहायला मिळतात. मात्र शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथून ...
माळशिरस : अनेक चित्रपटांच्या कथानकामध्ये आपल्या कुटुंबापासून अलग झालेल्या पात्रांचे रंजक कथानक पाहायला मिळतात. मात्र शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथून रोजीरोटीसाठी परदेशात गेलेल्या विकास बाळू साठे (वय-२०) या तरुणाची चार वर्ष पायपीट करून आई-वडील व कुटुंबाची घडलेली भेट कोरोना महामारीत अविस्मरणीय ठरली आहे.
विकासने घरी यायचे म्हणून पायपीट सुरू केली. पण भाषेची अडचण व दिशाहीन झालेला विकास फक्त चालत राहिला. त्यामुळे त्याच्या पायाला अनेक जखमा झाल्या आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक हाच त्याचा आसरा. मागून मिळेल ते खायचं काही ठिकाणी जबरदस्तीने लोकांनी कामालाही लावले. त्यावेळी तो त्यांना एकच सांगायचा की मला माझ्या आई-वडिलांकडे जायचं आहे. मात्र त्याच्या गावाविषयी कोणाला माहिती नसल्यामुळे विकासची परवड सुरूच राहिली.
जानेवारी २०१८ मध्ये कमी शिकलेला विकास रोजगारासाठी गावातल्या दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला. पुढे कुटुंबाचा संपर्क तुटला. विकासच्या आई, वडील व भावाने पोलिसात तक्रार दिली होती. अडाणी असलेले साठे कुटुंब हतबल होऊन विकासची वाट पाहत राहिले अन् मागील आठवड्यात फोन आला तुमचा विकास महुदमध्ये आहे. मग तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
आयेऽऽऽ म्हणत फोडला हंबारडा...
विकास नेपाळमध्ये कामावर गेला. तीन-चार महिन्यात दुकानदाराबरोबर वाद-विवाद झाल्यामुळे विकासने इंडियाचा रस्ता विचारत पायपीट सुरू केली. तो शेकडो कि.मी. चालत बंगालमध्ये पोहोचला. तिथं आला तेव्हा लॉकडाऊन पडले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच अनेक दिवस त्याने मुक्काम केला. पुढे तो मराठी बोलतोय म्हणून लोकांनी त्याला मुंबईच्या रेल्वेत बसवून पाठवले. तो मुंबईत उतरला खरा. पण अडाणी व भोळसर असलेल्या विकासला स्वतःचे गाव बचेरी व शेजारचे गाव दिघंची एवढीच माहिती होती. त्यामुळे पुन्हा त्याची पायपीट सुरू झाली. पुणे, सातारा, सांगली शहरातून तो पंढरपुरात गेला. तेथून तो दिघंची रस्त्याला लागला. महिम गावात आल्यानंतर टपरीवर बसलेल्या व्यक्तींनी कुठल्या गावाचा आहेस असे विचारले. त्याने गाव सांगतात, त्यांच्या पाहुण्याला फोन करून संबंधित गोष्टीची खात्री केली. पण विकासाच्या आई-वडिलांपर्यंत खबर पोहोचल्यानंतर माय लेकराची गाठ पडली. माय समोर दिसताच त्याने आयेऽऽऽ म्हणत फोडला हंबरडा.
फोटो :::::::::::::
बेपत्ता विकास बाळू साठे शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथे चार वर्षानंतर आपल्या कुटुंबासोबत.