हुतात्म्यांच्या फाशीनंतर सोलापूरकरांनी उच्च न्यायालयावर काढला होता मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:09 PM2019-01-18T15:09:30+5:302019-01-18T15:11:52+5:30

मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसुल कुर्बान हुसेन या चार निष्पाप देशभक्तांना इंग्रज सरकारने खोटे पुरावे ...

After the hanging of the martyrs, the Solapur High Court had taken a decision on the High Court | हुतात्म्यांच्या फाशीनंतर सोलापूरकरांनी उच्च न्यायालयावर काढला होता मोर्चा

हुतात्म्यांच्या फाशीनंतर सोलापूरकरांनी उच्च न्यायालयावर काढला होता मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायव्यवस्थेला काळिमा फासणारा हा दिवस सोलापूरच्या न्यायालयीन इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस१६ जानेवारी १९३१ रोजी संतप्त जनतेने उत्स्फूर्तपणे मुंबई उच्च न्यायालयावर निषेध मोर्चा काढला त्या निषेध मोर्चात प्रचंड संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता. या घटनेला आज ८८ वर्षे पूर्ण

मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसुल कुर्बान हुसेन या चार निष्पाप देशभक्तांना इंग्रज सरकारने खोटे पुरावे तयार करून आपल्या अंकित असलेल्या न्यायाधीशांकडून फासावर लटकावले. ६ जून १९३० रोजी न्यायाधीश वाडिया याने न्यायाचा मुडदाच पाडला. 

मिरवणूक बाळी वेशीत आली असताना मिरवणुकीतील एक जमाव रूपाभवानी मंदिराकडे गेला. तेथे त्यांनी शांततेने शिंदीची झाडे तोडून सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. त्यावेळी ब्रिटिश पोलिसांनी जमावातील त्या आठ जणांना अमानुष मारहाण करून पोलीस गाडीत टाकले. कलेक्टर नाईट व डी.एस.पी. फ्लेअर तेथे आले. कलेक्टर नाईट पिस्तूल काढतच मोटारीतून उतरला. तेव्हा चिडलेल्या जमावाने त्याला अक्षरश: घेरले. तो प्रचंड घाबरला. मल्लप्पा धनशेट्टींना हे समजताच ते धावत तेथे आले आणि त्यांनी जमावाला काही क्षणात शांत करून कलेक्टरांचा जीव वाचविला. त्यावेळी पोलिसांकडून पकडल्या गेलेल्या त्या आठ जणांना सोडण्याची विनंती.

धनशेट्टी यांनी केली. त्याबद्दल चर्चा चालू असतानाच शंकर शिवदारे हा १८ वर्षांचा कोवळा तरुण हातात तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत कलेक्टरजवळ आला. तेव्हा कलेक्टरजवळ असणाºया एका सार्जंटने त्याला गोळी घालून ठार केले. जमाव अधिक बिथरला. घाबरलेल्या कलेक्टर नाईट याने त्या आठ जणांची नावे टिपून त्यांना सोडून दिले. मात्र नंतर पोलिसांनी बेदरकारपणे केलेल्या गोळीबारात आणखी तीन जण ठार झाल्याने जमाव आणखी बिथरला आणि जवळच्याच मंगळवार पेठ पोलीस चौकीवर चालून गेला. चाँद अल्लाउद्दिन या शिपायाला बेदम मारहाण झाली. पोलीस चौकीला आग लावली गेली.

जमावाने दादा जाफर या पोलिसाला पकडून आगीत फेकून दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी पोलीस चाँद अल्लाउद्दिन हा उपचारादरम्यान  मरण पावला. एका बैठकीत कलेक्टर नाईटने सोलापूरच्या नागरिकांबद्दल अनुदार उद्गार काढल्यामुळे संतापलेल्या मल्लप्पा धनशेट्टी यांनी कलेक्टरच्या अंगावर धावत त्यास मारण्यासाठी खुर्ची उगारली होती. त्यामुळे कलेक्टर नाईट त्यांच्यावर डूक धरून होता. मल्लप्पा धनशेट्टी यांचे मित्र श्रीकिशन सारडा हे स्वातंत्र्य चळवळीस आर्थिक मदत करतात म्हणून कलेक्टर नाईटच्या मनात सारडांबद्दल प्रचंड रोष होता. उत्तम संघटक  असलेले जगन्नाथ शिंदे  यांच्या पाठीमागे सर्व युवकवर्ग होता. स्वातंत्र्य चळवळीतील शिंदे यांचा सहभाग कलेक्टर नाईटच्या डोळ्यात खुपत होता. 

अब्दुल रसुल कुर्बान हुसेन हे कामगार चळवळीचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यासाठी करीत होते. त्यांच्या ‘गजनफर’ या साप्ताहिकातून हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य घडवून आणले जात होते. ब्रिटिश राजवटीचे वाभाडे काढले जात होते. त्यामुळेदेखील अब्दुल रसुल कुर्बान हुसेन हे कलेक्टर नाईटच्या रडारवर होते. या चौघांनाही धडा शिकविण्याचा त्याने कट  रचला होता. 

अज्ञात जमावाने केलेल्या हल्ल्यात दोघा पोलीस शिपायांच्या मृत्यूप्रकरणी धनशेट्टी, शिंदे, सारडा आणि कुर्बान हुसेन या चौघांविरुद्ध खोटा पुरावा तयार करून कलेक्टर नाईटने त्यांना हेतूपूर्वक खोटेपणाने गुंतविले. बारा खोटे साक्षीदार उभे केले. न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश वाडिया याने आरोपी पक्षाला साक्षीदारांचा उलट तपास करू दिला नाही आणि आरोपींतर्फे एकही साक्षीदार तपासू दिले नाही. खटल्याचा केवळ फार्स होता.

चौघांनाही फाशीच देण्याचे ठरवूनच खटला चालविण्याचे नाटक करण्यात आले. ६ जून रोजी चौघांनाही फाशीची शिक्षा ठोठावली. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आतच खटला निकाली काढण्यात आला. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच कलेक्टर नाईटने एक आठवडा अगोदरच वरिष्ठांना पत्र लिहून नागरिकांच्या मनात दहशत बसण्यासाठी, आरोपींना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याबद्दलची परवानगी मागितली होती. फाशीची शिक्षा देणारा वाडिया बढतीसाठी एवढा हपापला होता की, सोलापूरला येणाºया उच्च पदस्थ ब्रिटिश अधिकाºयाचे स्वागत करण्यासाठी तो रेल्वे स्टेशनवर गेला होता आणि संध्याकाळी झालेल्या पार्टीत नाचला होता! उच्च न्यायालयातदेखील अपिलाच्या सुनावणीदरम्यान इंग्रज न्यायाधीशांनी या चार हुतात्म्यांना न्याय दिला नाही. न्यायाचा मुडदा पाडूनच चार देशभक्तांना १३ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आली. मुंबईत कडकडीत हरताळ पाळण्यात आला. 

१६ जानेवारी १९३१ रोजी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मुंबई उच्च न्यायालयावर निषेध मोर्चा काढला. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोर उग्र निदर्शने झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या संपूर्ण इतिहासात निषेध मोर्चा काढला जाण्याची ही पहिलीच घटना होती. त्या निषेध मोर्चात सत्यशोधक चळवळीतील नेते दिनकरराव जवळकर यांनी सोलापूरच्या या चार हुतात्म्यांना अभिवादन करणारे भाषण केले. इंग्रज सरकारने जवळकरांना व त्यांच्या सहकाºयांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला आणि इंग्रज न्यायाधीशांनी या सर्वांना १५ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी कारागृहात केली. चार हुतात्म्यांचा जयजयकार करत हे सर्व जण शिक्षा भोगण्यासाठी कारागृहामध्ये दाखल झाले.  या ऐतिहासिक घटनेला आज झाली ८८ वर्षे! 

जनतेने सरकारचा नोंदविला तीव्र निषेध...
४ मे १९३० रोजी इंग्रज सरकारने मिठाच्या सत्याग्रहाबद्दल म. गांधींना सुरतमधून अटक करून त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात केली होती. गांधीजींच्या अटकेची बातमी दुसºयाच दिवशी ५ मे रोजी वर्तमानपत्रातून समजताच जनतेने हरताळ, मिरवणुका आणि जंगी जाहीर सभा आयोजित करून सरकारचा तीव्र निषेध केला. ७ मे रोजी १८ हजार गिरणी कामगार संप पुकारून रस्त्यावर उतरले. सोलापूरकरांनी प्रचंड निषेध मिरवणूक काढली.

संतप्त सोलापूरकरांची धगधग...

  • - न्यायव्यवस्थेला काळिमा फासणारा हा दिवस सोलापूरच्या न्यायालयीन इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस होय. यात खुनशीपणाचा कहर म्हणजे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेस गालबोट लावून अडथळा आणण्यासाठी १२ जानेवारी १९३१ रोजी म्हणजे ऐन यात्रेतील धार्मिक सोहळ्यात पहिल्याच दिवशी धनशेट्टी, शिंदे, सारडा आणि कुर्बान हुसेन   या चौघा निष्पापांना फाशी दिली गेली. 
  • - न्यायाचा मुडदा पाडणाºया या खटल्यातील इंग्रज सरकारच्या या अन्यायकारक न्यायदानाच्या विरोधात १६ जानेवारी १९३१ रोजी संतप्त जनतेने उत्स्फूर्तपणे मुंबई उच्च न्यायालयावर निषेध मोर्चा काढला होता. त्या निषेध मोर्चात प्रचंड संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता. या घटनेला आज ८८ वर्षे पूर्ण होत आहेत.

- अ‍ॅड. धनंजय माने.

Web Title: After the hanging of the martyrs, the Solapur High Court had taken a decision on the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.