‘आम्ही पुण्याहून आलोय,’ ऐकताच हातातील काम सोडून महापालिका कर्मचारी एकेक करत पडू लागले बाहेर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:40 PM2020-03-17T12:40:08+5:302020-03-17T12:42:40+5:30
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी पुणेरी सोलापूरकरांची गर्दी; उपायुक्तांनी समजूत काढल्यावर कर्मचाºयांनी कामास केली सुरुवात
राकेश कदम
सोलापूर : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सोमवारी दुपारी सोलापूरकरांची गर्दी झाली. गर्दीतली बहुतांश मंडळी पुणेरी सोलापूरकर होते. ‘मी पुण्याहून आलोय.. असे अनेकांचे सूर कानी पडताच एकेक कर्मचारी कार्यालयाबाहेर पडले. कोरोनाच्या धसक्यामुळे कर्मचाºयांनी अचानक काम करण्यास नकार दिला. उपायुक्त अजयसिंह पवार यांनी कर्मचाºयांची समजूत काढल्यानंतर काम सुरू झाले.
एनआरसीच्या धसक्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जन्म दाखले काढण्यासाठी गर्दी वाढली आहे. पाच हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. कोरोनामुळे पुण्यातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे पुण्यात राहणारे सोलापूरकर परतले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात सोमवारी गर्दी होती. कर्मचारी मास्क लावून काम करीत होते. गर्दी पाहून महिला कर्मचारी काम करायला नकार देत होत्या. त्यातच दुपारी काही लोक आम्ही पुण्यातून आलोय. परत जाण्यापूर्वी आम्हाला दाखले द्या, असे सांगू लागले. हे बोलणे कर्मचाºयांनी ऐकले. कुजबूज सुरू झाली आणि कर्मचारी बाहेर आले. उपनिबंधक संदीप कुरडे यांच्यासह कर्मचाºयांनी उपायुक्त अजयसिंह पवार यांचे कार्यालय गाठले. गर्दी कमी करण्यासाठी तातडीने उपाय करु, असे उपायुक्तांनी सांगितले. त्यानंतर कर्मचारी परतले.
कार्यालयाची जागा बदलण्याची तयारी
- जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील गर्दी आणि कर्मचाºयांचे हाल याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी महापौर आरिफ शेख, एमआयएमचे गटनेते रियाज खरादी आदींनी सायंकाळी आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेतली. कार्यालयातील जागा अपुरी पडू लागल्याने कौन्सिल हॉलमधील एलबीटी कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय हलवण्याचा विचार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अभिलेखापाल कार्यालय आहे त्या ठिकाणी राहील. १९९१ नंतरचे रेकॉर्ड आणि दाखले देण्याची व्यवस्था नव्या जागेत ठेवू. लवकरच निर्णय घेऊ, असे आयुक्त तावरे यांनी सांगितले.