शासकीय ध्वजारोहणानंतर डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By संताजी शिंदे | Published: August 15, 2023 10:50 AM2023-08-15T10:50:51+5:302023-08-15T10:51:04+5:30
पोलिसांनी घेतले ताब्यात : सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटना
सोलापूर : सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर, एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नव्या महसूल भावना समोर शासकीय ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणा नंतर त्यांच्या भाषणाला सुरूवात झाली. दरम्यान एका युवा शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले व आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर भारत पाटील (रा.दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बँकेने त्यांच्या सातबारावर बोजा चढवल्यामुळे त्याने आत्मदानाचा प्रयत्न केल्याचे समजते. शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून, सदर बाजार पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत असे समजते.