Good News; जळगावनंतर आता सोलापुरात होणार केळीचे क्लस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:24 AM2020-01-23T10:24:28+5:302020-01-23T10:26:29+5:30
समितीची आज होणार बैठक; माढा, करमाळ्यात वाढले निर्यातक्षम केळीचे क्षेत्र
राजकुमार सारोळे
सोलापूर : राज्यात जळगावनंतर आता सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्लस्टर निर्माण करण्यावर प्रशासनाने पाऊल उचलले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून अरब राष्ट्रासाठी केळी निर्यात झाली आहे. चार वर्षांत सौदी, अफगाणिस्तान, इराण, ओमान या देशात केळीचे प्रामुख्याने निर्यात होत आहे. यंदा मात्र प्रथमच करमाळा तालुक्यातील पोफळजच्या शेतकºयांची केळी रशियाला निर्यात झाली आहे. अरब राष्ट्रापेक्षा रशियाच्या बाजारपेठेत अधिक गुणवत्तेची केळी लागते. या गुणवत्तेची केळी करमाळा तालुक्यातील कंदर, शेटफळ, वांगी-१, चिखलठाण, पोफळज, वरकटणे व माढा तालुक्यातील निमगाव, टेंभुर्णी, अरण परिसरातील शेतकरी घेऊ लागले आहेत. वास्तविक आत्तापर्यंत केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्याचे नाव होते. पण आता सोलापूरने जळगावच्या बरोबरीत स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथील शेतकºयांना जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांच्या धर्तीवर निर्यातीसाठी सुविधा मिळाव्यात म्हणून द्राक्ष, डाळिंबानंतर आता केळीचे क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वास्तविक केळी उत्पादन करमाळा, माढ्यानंतर भीमानदीकाठच्या पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील गावांमध्येही केळीचे पीक घेतले जाते. येथील केळी स्थानिक, पुणे व हैदराबाद मार्केटमध्ये विकली जात आहे. पण माढा आणि करमाळा येथील शेतकºयांनी निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर दिला आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नाशिकचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्याचा यात नगण्य सहभाग आहे. त्या खालोखाल डाळिंबाचा क्रमांक लागल्याने डाळिंबासाठी क्लस्टर निर्माण करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. आता केळीमध्येही शेतकºयांनी गुणवत्ता सिद्ध करून दाखविल्याने त्यादृष्टीने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
काय होईल फायदा
- जिल्ह्यात केळी उत्पादनासाठी क्लस्टर निर्माण केल्यास शेतकºयांना पुढील सुविधा मिळणार आहे. निर्यातक्षम केळीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई व पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. जिल्हा कृषी कार्यालयाला हा अधिकार दिल्याने हे हेलपाटे बंद होतील. शेतकºयांना केळी निर्यात करण्यासाठी पॅकिंग हाऊस, कोल्डस्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी अनुदान मिळेल. यासाठी शेतकºयांनी गटाने क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी सुविधांची मागणी करावी लागेल.
जिल्ह्यात निर्यातक्षम केळीचे वाढते उत्पादन लक्षात घेऊन जळगावनंतर सोलापुरात केळीचे क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा विचार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक अपेडाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. केळीचे क्लस्टर झाल्यास शेतकºयांना विविध सुविधा मिळणार आहेत.
रवींद्र माने, उपसंचालक, कृषी विभाग