हरविलेल्या पिता-पुत्राच्या भेटीनंतर पोलीसही गहिवरले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:34 PM2019-06-24T12:34:53+5:302019-06-24T12:38:16+5:30
मोहोळ पोलिसांची कामगिरी; रडत बसलेल्या सूरजला भेटले वडील
मोहोळ : रेल्वेमधून हरविलेल्या मुलाला सुखरुप पाहिल्यानंतर बापाने मिठी मारून आनंद व्यक्त केला. बाप-लेकाच्या भेटीने मोहोळ पोलीस ठाण्यातील कठोर असणारे पोलीसही गहिरवले.
पळस फाटा (पनवेल) येथील नितीन बबन बोंबले यांना पाच अपत्ये असून घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते कचरा आणि भंगार गोळा करून उदरनिर्वाह करतात. गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी भांडण करून पाचपैकी तीन लेकरे घेऊन वेगळे राहू लागली. गरिबीमुळे लेकरांचे पालनपोषण करणे तिला पेलवेना, म्हणून तिने चिमुकला मुलगा सूरज यास आश्रमशाळेत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बुधवारी १९ जून रोजी त्याला घेऊन सोलापूरकडे निघाली होती; मात्र सूरजने मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावातून तिच्यापासून पळ काढला. लांबोटी परिसरात रडत बसलेल्या सूरजला सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्याचे नाव, गाव विचारुन त्याची चौकशी करण्याची जबाबदारी सहायक फौजदार शेलार यांच्याकडे सोपवली. शेलार यांनी महेश कटकधोंड यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. आपण मुंबईतील असून, आईने सोडले आहे. वडील पळस फाटा येथे राहतात, मला त्यांच्याकडे सोडा असे सूरजने सांगितले.
मोहोळ पोलिसांनी पनवेल येथील पोलीस किंगरे यांच्याकडून या परिसराची खात्री केली. पळस फाटा येथील नितीन बोंबले यांचा शोध घेऊन मुलाचा फोटो दाखविला. तो आपलाच मुलगा असल्याचे त्यांनी मान्य केले.
थोडेफार पैसे गोळा करून मिळेल त्या वाहनाने बोंबले हे मोहोळ पोलीस ठाण्यात आले. आपले वडील समोर दिसताच सूरज त्यांच्याकडे धावत निघाला आणि मोठ्याने रडू लागला. बाप-लेकाच्या या भेटीनंतर पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सूरजला नवीन कपडे घेऊन दिले. त्याला शाळेत पाठविण्यासाठी काही रक्कमही दिली.
आपला हरविलेला मुलगा सापडल्याने वडील नितीन बोंबले यांनी पोलिसांचे आभार मानले. सूरजनेही पोलिसांना ‘बाय’ करीत कृतज्ञता व्यक्त केली.