महिना लोटला तरी दहा तोळे सोन्याच्या तपास लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:16+5:302021-02-14T04:21:16+5:30
टेंभुर्णी : एक महिना लोटला तरी १० तोळे सोन्याच्या चोरीचा शोध लावण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. यामुळे एका ...
टेंभुर्णी : एक महिना लोटला तरी १० तोळे सोन्याच्या चोरीचा शोध लावण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. यामुळे एका ३० वर्षीय तरुणीस दोन मुलांसह माहेरीच राहण्याची वेळ आली आहे. मुलीचे वडील यामुळे हतबल झाले आहेत. दररोज पोलीस ठाण्यापुढे हेलपाटे घालत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की कल्याण येथील शीतल अमित नवले (वय ३०) ही विवाहित महिला करमाळा तालुक्यातील कंदर येथे माहेरी आली होती. १७ जानेवारी रोजी शीतल नवले या आई कालिंदी भोसले यांच्यासह टेंभुर्णी बस स्थानकावरून बसने इंदापूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची दोन मुलेही होती. त्या बार्शी- पुणे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. बसमध्ये गेल्यानंतर तिकिटासाठी पर्स उघडली तेव्हा पर्समधील सोन्याचे दागिने ठेवलेला डबा चोरीस गेल्याचे शीतल यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी लगेच बस थांबवून आईसह टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दिली होती.
या घटनेस आता एक महिना होत आला तरी टेंभुर्णी पोलिसांना अद्याप चोरीचा शोध लागलेला नाही.
तिकडे चोरीस गेलेले सोने घेऊनच सासरी ये अशी भूमिका शितलच्या सासरकडील लोकांनी घेतली आहे. चोरीचा शोध काही लागत नाही. त्यामुळे शीतल नवले या विवाहित तरुणीस दोन मुलासह माहेरी राहण्याची वेळ आली आहे. शीतलचे आईवडीलही हातबल झाले आहेत. चोरीचा शोध लावा म्हणून ते कामधंदा सोडून दररोज टेंभुर्णी पोलीस स्टेशनला चकरा मारत आहेत.
----
मुलीस माहेर पाठवणे झाले अडचणीचे
पोलीस मात्र नेहमीच्या स्टाईलने तपास चालू आहे असे सांगून त्यांची बोळवण करीत आहेत. जोपर्यंत चोरीस गेलेले सोने मिळत नाही तोपर्यंत मुलीला सासरी पाठवणे त्यांना अडचणीचे झाले आहे. पोलिसांनी चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा अशी अपेक्षा मुलीचे वडील बळीराम भोसले यांनी व्यक्त केली आहे. चोरीस गेलेल्या डब्यात २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आदी दागिने होते.