वडिलांनंतर अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू : अंकुश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:16 PM2019-07-16T12:16:51+5:302019-07-16T12:20:17+5:30

गुरूपोर्णिमा विशेष; सोलापूर शहर पोलीस आयुक्तांचा ‘लोकमत’ शी संवाद

After my father's experience, my greatest teacher is Ankush Shinde | वडिलांनंतर अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू : अंकुश शिंदे

वडिलांनंतर अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू : अंकुश शिंदे

googlenewsNext
ठळक मुद्देआजवर मी इथपर्यंत परिस्थितीनुसार माझ्या अनुभवावर घडत आलो - अंकुश शिंदेआयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरुची गरज भासते. सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते - अंकुश शिंदेआयुष्याचे धडे घेत असताना माझ्या तीन गुरूंनी मला शिकवलं, घडवलं आहे, ज्याचा हिशोब मांडता येणार नाही - अंकुश शिंदे

संताजी शिंदे
सोलापूर : आयुष्य खूप सुंदर आहे, ते कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. चांगल्या गोष्टीचं अनुकरण केलं की त्याचे परिणाम खूप चांगले होतात. जीवनातील माझे पहिले गुरू माझे वडील, त्यानंतर त्यांचे मित्र आणि शालेय जीवनातील शिक्षक होय. शालेय जीवनानंतर मात्र माझे अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू ठरला असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मी मूळचा आंबाजोगाई तालुक्यातील (बीड जिल्हा) होळे या गावचा रहिवासी आहे. माझे वडील मूळचे शेतकरी होते. त्यांचे जेमतेम शिक्षण हे फक्त ४ थी पर्यंत झालेले. शिक्षण ४ थीपर्यंत झाले तरी त्यांना खूप चांगले ज्ञान होते. कोणावर अन्याय होणार नाही अन् अन्याय सहन करायचा नाही हा त्यांचा मूळ स्वभाव होता. जेव्हा मी लहानाचा मोठा होऊ लागलो, जग काय असतं हे मी डोळ्यानं पाहू लागलो तेव्हा वडील हे माझे मार्गदर्शक होते. चांगल्या, वाईट गोष्टींबद्दल ते नेहमी मला सांगत होते. काय केलं पाहिजे, काय नाही याचं मार्गदर्शन ते माझ्या ज्या त्या वयात माझ्या बुद्धीला समजेल अशा पद्धतीने सांगत असत. वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं मी आजूबाजूचा परिसर समजून घेऊ लागलो. कुठं कसं वागायचं अन् कसं बोलायचं याचा अंदाज घेत मी लहानाचा मोठा झालो. 

दरम्यान, गावात राहणाºया माझ्या वडिलांचे जिवलग मित्र विठ्ठल कांबळे यांच्या सहवासात आलो. मी विठ्ठल कांबळे यांच्या घरचा सदस्य झालो. आठवड्यातील चार दिवस त्यांच्या घरी मुक्कामी राहात होतो. दरम्यानच्या काळात विठ्ठल कांबळे यांनी मला सामाजिक समतेबद्दल मार्गदर्शन केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी प्रभावीत झालो. बाबासाहेबांसारखी व्यक्ती बिकट परिस्थितीमधून जर शून्यातून स्वत:चं विश्व निर्माण करीत असेल तर आपण स्वत:च अस्तित्व का निर्माण करू शकत नाही हा प्रश्न मला पडला. त्यांची प्रेरणा घेऊन मी शिक्षण घेतलं. गावातील होळेश्वर विद्यालयात शिक्षण घेत असताना मला मापारी गुरुजी हे शिक्षक लाभले. वाढत्या वयात मनाला पडणारे प्रश्न आणि जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होत होती तेव्हा पुस्तकी ज्ञानाबरोबर बाह्य गोष्टींची माहिती माझे गुरुजी मला करून देत होते. तीन गुरूंच्या सान्निध्यातून मी खूप शिकलो. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर मी माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केला. आजवर मी इथपर्यंत परिस्थितीनुसार माझ्या अनुभवावर घडत आलो. सध्या अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू आहे असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले.

गुरूनं दिलेले धडे आत्मसात करता आले पाहिजेत
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरुची गरज भासते. सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते. शालेय तसंच कॉलेजचं शिक्षण आॅनलाईन पद्धतीनं घेणं शक्य झालंय. त्यामुळे तरुणाईनं तंत्रज्ञानालाच आपला मार्गदर्शक मानलं आहे. पण तंत्रज्ञान हे तुमच्या चुकांची जाणीव करून देऊ शकणार नाही. त्यासाठी उत्तम मार्गदर्शकच हवा. तंत्रज्ञान विकसित झालं असलं तरी गुरूचं ज्ञान हे कायम मोलाचं असतं. गुरू माझ्यावरील संस्कारांचे शिल्पकार आहेत. आयुष्याचे धडे घेत असताना माझ्या तीन गुरूंनी मला शिकवलं, घडवलं आहे, ज्याचा हिशोब मांडता येणार नाही. गुरूनं शिकवलेले धडे तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजेत असा संदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला. 

Web Title: After my father's experience, my greatest teacher is Ankush Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.