लोकमतच्या वृत्तानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धनचे दोन अधिकारी निलंबित, सीईओ राजेंद्र भारूड यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:40 PM2018-02-06T14:40:35+5:302018-02-06T14:41:29+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे. नेमणुकीच्या ठिकाणी वारंवार गैरहजर राहणारे बीबीदारफळ येथील पशुधन विकास अधिकारी भरत माने आणि गायीला चुकीचे कृत्रिम रेतन करणारे पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
जि.प.चा पशुसंवर्धन विभाग सध्या सदस्यांच्या रडारवर आहे. या विभागातील बेफिकीर कारभाराची पोलखोल ‘लोकमत’ने सुरू केली आहे. स्वच्छता अभियानात जिल्ह्याचा नावलौकिक करणाºया डॉ. भारुड यांनीही बेफिकीर अधिकाºयांची सफाई करण्याचे काम सुरू केले आहे. बीबीदारफळ येथील पशुधन विकास अधिकारी भरत माने यांच्याबाबत सुरेश साठे यांनी तक्रार केली होती. माने यांनी मद्य पिऊन चुकीचे उपचार केल्याने ८.५ महिन्यांची गाभण जर्सी गाय खाली झाली. शिवाय माने हे गावात येत नसल्याची तक्रार सरपंचांनी केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताचा उल्लेखही निलंबन आदेशात करण्यात आला आहे. यावरुन माने यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जि. प. तील कामचुकार अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.
--------------------------
चुकीचे रेतन केल्याचे कबूल केले...
मोहन चौधरी यांनी पशुधन विकास अधिकारी या पदावर बीबीदारफळ येथे कार्यरत असताना शाहू लामकाने यांच्या खिलार गायीला चुकीचे कृत्रिम रेतन केले. त्यामुळे या गायीला होस्टन (जर्सी) जातीच्या वासराचा जन्म झाला. याबद्दल विचारणा केल्यानंतर चुकून झाल्याचे कबूल केले. चौधरी यांच्या बेफिकीर कारभारामुळे गायीच्या गर्भधारणेवर परिणाम झाला आहे. गायीला चारवेळा कृत्रिम रेतन करुनही ती गाभण राहिलेली नाही. या प्रकरणी गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
-----------------
पराग यांच्यावर केव्हा होणार कारवाई
जिल्ह्यात अनेक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांबाबत तक्रारी येत आहेत. तरीही पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण पराग या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आले आहेत. अलीकडच्या काळात तर कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी डॉ. पराग यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू केले होते. मोहन चौधरी यांच्याबाबतच्या तक्रारी तर खूपच जुन्या आहेत.‘लोकमत’ने या प्रकरणांची पोलखोल केल्यानंतर सीईओ डॉ. भारुड यांनी कार्यवाहीचे आदेश दिले. त्यामुळे पशुपालकांच्या गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया डॉ. किरण पराग यांच्यावर कोणती कारवाई होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.