सात दिवसांच्या उपचारानंतर सोलापूर जिल्ह्यातील ३० टक्के रुग्ण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 03:32 PM2021-06-03T15:32:55+5:302021-06-03T15:35:04+5:30
ग्रामीणमध्ये २४ तासांत २० टक्के मृत्यू; मेमध्ये सर्वाधिक प्रकार
सोलापूर : दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागात मृत्युदर चिंताजनक ठरला. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या मृत्यूच्या विश्लेषणात अंगावर आजार काढल्याने २० टक्के मृत्यू चोवीस तासांत झाल्याचे दिसून आले आहे.
मेअखेर ग्रामीण भागात काेरोनाचे २ हजार ६०५ मृत्यू नाेंदले गेले. मृत्यूचे विश्लेषण केल्यावर चोवीस तासांच्या आत म्हणजे उपचाराला संधी न देता झालेले आत्तापर्यंत ५१७ मृत्यू झाले आहेत. यातील २८१ मृत्यू पहिल्या लाटेत तर २३६ मृत्यू दुसऱ्या लाटेतील आहेत. दुसऱ्या लाटेत मे महिन्यात १३० मृत्यू चोवीस तासांच्या आत झाले आहेत. पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात ८५ इतके झाले होते. याचा अर्थ, दुसऱ्या लाटेतही बऱ्याच लोकांनी आजार अंगावर काढल्याचे दिसत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
४८ तासांत म्हणजे उपचारास दाखल केल्यानंतर, दोन दिवसांत मरण पावलेल्यांची संख्या ३२२ इतकी आहे. यातही एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजे १०२ व मे महिन्यात ९९ मृत्यू झाले आहेत. ७२ तासांनंतर २९१ मृत्यू झाले असून, यातही एप्रिलमध्ये ७१ व मेमध्ये ८७ जणांचा समावेश आहे. ३ ते ७ दिवसांदरम्यान ६७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एप्रिलमध्ये १५८ व मेमध्ये १९० जणांचा समावेश आहे. दिवसानंतर ७९७ जण मरण पावले असून, एप्रिलमध्ये ११३ तर मे महिन्यात ३०९ जण आहेत. मृत्यूचा कालावधीनुसार विचार केल्यास २४ तासांत १९.८५, २४ ते ४८ तासांदरम्यान १२.४, ४८ ते ७२ तासादरम्यान ११.२, ३ ते ७ दिवसापर्यंत २६ आणि सात दिवसांनंतर ३०.६ टक्के मृत्यू झाले आहेत.
सर्वेक्षणाचा चांगला परिणाम
आजार अंगावर काढल्याने २० टक्के बाधितांचा मृत्यू झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या लाटेत सर्वेक्षण मोहीम राबविली. यात कोमार्बीड लोकांवर लक्ष ठेवण्यात आले. दुसऱ्या लाटेत याकडे दुर्लक्ष झाल्याने मृत्यू वाढले. त्यानंतर, पुन्हा सर्वेक्षणावर भर दिल्याने चांगला परिणााम दिसून येत आहे. जसे मृत्यूच्या कालावधीचे परीक्षण झाले, तसेच मरण पावलेल्यांना कोणते आजार होते, याही कारणांचा अभ्यास करण्यात आला. यात टेन्शन, मधुमेह, टेन्शन व मधुमेह असे आजार असलेले जास्त रुग्ण असल्याचे दिसत आहे.