सात वर्षांनी सोलापूरच्या खगोलप्रेमींनी जवळून पाहिले ‘कार्तिकी’च्या चंद्रावरचे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 02:30 PM2018-11-22T14:30:22+5:302018-11-22T14:34:00+5:30
सोलापूर : शहरातील स्मृती उद्यान परिसरात सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रातून खगोलप्रेमींना बुधवारी सायंकाळी कार्तिकीचा चंद्र आणि ...
सोलापूर : शहरातील स्मृती उद्यान परिसरात सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रातून खगोलप्रेमींना बुधवारी सायंकाळी कार्तिकीचा चंद्र आणि त्यावरील खड्डे अतिशय जवळून पाहता आले. येथील दुर्बिणीतून चंद्राचा ३० वा भाग जवळून पाहताना त्यावरील डोंगर, दरी, उल्कांच्या आदळण्याने निर्माण झालेल्या ज्वालामुखीच्या दूरवर वाहत गेलेल्या लाव्हामुळे बनलेली दरी पाहताना या खगोलप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला.
स्मृती उद्यान येथे उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षणगृहाचे उद्घाटन २ मार्च २०१२ रोजी माजी राष्टÑपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनानंतर या दुर्बिणीतून एकदाही आकाशदर्शन झाले नाही. पण सहा वर्षे, आठ महिने २० दिवसांनी आकाशदर्शन होण्याचा योग जुळून आला.
आकाश निरीक्षणाच्या तांत्रिक माहितीच्या अभावामुळे या दुर्बिणींची दुरवस्था झाली होती. मागील सात वर्षांत झालेले तंत्रज्ञानातील बदल, दुर्बिणीसाठी लागणारे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासोबतच दुर्बिणीतून दिसणारी प्रतिमा संगणकाद्वारे छायाचित्राच्या माध्यमातून साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले. इनोव्हेशन टेक्नॉलॉजी मुंबई या खगोलशास्त्रीय उपकरणे तयार करणाºया संस्थेने ही दुर्बीण अद्ययावत केली. अनुराग शेवडे या खगोल उपकरण तंत्रज्ञाने चार महिने अथक प्रयत्न करून ही दुर्बीण कार्यान्वित केली. सामाजिक वनीकरणाच्या आकस्मिक निधीअंतर्गत आर्थिक मदत मिळवून देत अधिकारी सुवर्णा माने यांच्या प्रयत्नातून हे केंद्र पुन्हा सुरू केले.
- बुधवारी सायंकाळी २५० ते ३०० खगोलप्रेमी सोलापूरकरांनी चंद्र अगदी जवळून पाहिला. त्यांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. कार्तिक पौर्णिमेचा चंद्र पिवळसर व सुंदर दिसत होता. चंद्राच्या एका भागाकडील दिसणारा दिवसरात्र यांच्या सीमारेषेच्या प्रदेशातील असंख्य विवरे जवळून पाहता आली. आनंद घैसास, डॉ. व्यंकटेश गंभीर, प्रा. सिद्राम पुराणिक, तंत्रज्ञ अनुराग शेवडे यांनी ही माहिती उपस्थितांना दिली. हे निरीक्षणगृह अद्ययावत व पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. सचिन जोग, अनिरुद्ध देशपांडे, संजय भोईटे, अॅड. रघुनाथ दामले, मोहन दाते, नीता येरमाळकर, सुवर्णा माने आदींनी सहकार्य केले.