पालकमंत्र्यांच्या अश्वासनानंतर अखेर तहसिलदार, नायबतसहिलदार यांचे आंदोलन मागे!
By संताजी शिंदे | Published: April 7, 2023 07:10 PM2023-04-07T19:10:45+5:302023-04-07T19:10:53+5:30
सोमवार पासून कामावर होणार हजर.
सोलापूर : राजपत्रित वर्ग-२ प्रमाणे आम्हालाही ग्रेडपे देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या अश्वासनामुळे ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
राज्यभरातील दोन हजार २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदारांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. राजपत्रित वर्ग-२ नायब तहसीलदार या कार्यकारी पदाचा विद्यमान ग्रेडपे देण्यात यावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. सोलापुरात काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय पातळीवरील कामे ठप्प झाले होतो.
राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग-३ वरून वर्ग-२ असा केला होता. मात्र, वर्ग-२ प्रमाणे वेतनवाढ केली नाही. वर्ग-२ साठी ग्रेड पे ४८०० आहे. वर्ग-३ साठी ग्रेडपे ४३०० होता, तो तेवढाच ठेवण्यात आला आहे, त्यात वाढ केली नाही. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग-२ या पदावर काम करतात. मात्र वर्ग-३ चे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेडपे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली होती.
महसूल विभागाने सकारात्मक अभिप्रायासह सादर केलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी एप्रिल अखेर पर्यंत कालावधी लागणार आहे, त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन संप मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.