लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...
By राकेश कदम | Published: June 5, 2024 04:42 PM2024-06-05T16:42:17+5:302024-06-05T16:43:31+5:30
सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले
राकेश कदम, साेलापूर: साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा ७४ हजार १९७ मतांनी पराभव झाला. या निकालावर सातपुतेंनी यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. साेलापूरकरांशी संवाद साधताना सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले.
सातपुते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि एनडीए यांच्या कामांवर विश्वास दाखवत मला मत देणाऱ्या सोलापूरमधील पाच लाख ४६ हजार मतदार बंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. सोलापूरकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास खरोखर भारावून टाकणारा आहे. अतिशय अल्पावधीत सोलापूरकरांनी दिलेलं हे उदंड प्रेम माझ्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत माझ्यासाठी अतिशय मेहनत घेऊन काम केलेल्या महायुतीमधील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कामावर विश्वास ठेवत मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा देखील मनापासून आभारी आहे.
सोलापूरकरांशी असलेले माझे हे ऋणानुबंध असेच कायम राहतील. सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे आणि आपले कोणतेही प्रश्न, अडचणी घेऊन येणाऱ्या सोलापूरच्या मायबाप जनतेसाठी मी नेहमीच उपलब्ध असेल, त्यांच्या सेवेत मी नेहमीच कार्यरत आहे, अशी ग्वाही मी या निमित्ताने देऊ इच्छितो.