हमरी-तुमरीनंतर बस चालकाने वाहकास सोडून एस़टी पुढे नेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:20 PM2019-03-27T17:20:56+5:302019-03-27T17:22:23+5:30
दोघांच्या भांडणात प्रवाशांचा फुकट प्रवास, नान्नज बस स्टॉपवरील प्रकार
वडाळा : बसमध्ये भांडी घेऊन प्रवासासाठी चढलेल्या भांडी विक्रेत्याशी झालेल्या वादात बसच्या वाहकाने चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे भडकलेल्या बसचालकाने चक्क भांडीविक्रेता प्रवासी आणि बसवाहकाला उतरवून बस पुढे नेल्याचा प्रकार बुधवारी घडला.
२६ मार्चला दुपारी १२ वाजता नान्नज येथे बार्शी आगाराची एसटी बस (एम.एच. १४- ९२७१) आपल्या फेºया पूर्ण करत नान्नज बस स्टॉपवर पोहोचली. काही प्रवासी बसमध्ये चढले. त्यामध्ये एक भांडी विक्री करणारा व्यावसायिकही होता. त्याच्याकडील भांडी पाहून चालक राजाराम नंदवटे यांचे माथे भडकले. बसमध्ये भांडी व साहित्य नको, असे म्हणत त्या प्रवाशासोबत उद्धट वर्तन केले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
चालकाच्या रागाचा पारा चांगलाच वाढला. वाद वाढल्याने चालकाने भांडीविक्रेत्यासह बसचे वाहक आनंद उबाळे यांनाही खाली उतरवले. बसमध्ये आणखी प्रवासी चढत असताना त्यांना एसटीमध्ये न घेताच बस सुरू केली व पुढच्या गावाला नेली.
नान्नज बस स्टॉपवरून वडाळा येथील प्रदीप पवार यांनाही वडाळा गावी जायचे होते. परंतु त्यांनाही एसटीमध्ये घेतले नाही. तशीच एसटी घेऊन पुढे निघून गेले. त्यामुळे प्रदीप पवार यांनी वडाळा येथील शशिकांत खडके यांना त्यांनी मोबाईलवरून ही माहिती दिली. दरम्यान, वडाळा येथील काही नागरिकांनी चालकास एसटी थांबविण्यास भाग पाडले.
केमवाडी येथील हरिदास माधव काळे हे सोलापूरहून वडाळ्यासाठी याच बसने निघाले होते. वडाळा येथून एसटीमध्ये चढणाºया प्रवाशांना त्यांनी बसमध्ये वाहक नसल्याने प्रवास करू नका, असे सुचविले. मात्र चालक राजाराम नंदवटे वेगळ्याच फॉर्मात होते. चला आज एसटी तुमच्यासाठी फुकट आहे, असे म्हणून प्रवाशांना ते विनातिकीट पुढे घेऊन निघून गेल्याचे सांगण्यात आले.
वाहकाने वादात केली होती मध्यस्थी...
बसमधील वाहक आनंद उबाळे यांनी भांडीविक्रेत्यासोबत चालकाचा वाद सुरू असताना समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला. तुम्ही केबिनमध्ये पाहा, आतील प्रवाशांशी कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नका, बाकी मी सांभाळतो. तुम्ही बस चालविण्याचे तुमचे काम करा, असे सांगितले. मात्र त्यामुळे चालक राजाराम नंदवटे यांना त्यांचा राग आला. यामुळे भांडीविक्रेत्यासह बसवाहकालाही उतरविण्याचा प्रकार घडला. दोन दिवसांपासून बसचालक प्रवाशांशी उद्धट वर्तन करत होते, असे वाहक आनंद उबाळे यांनी सांगितले.