बबनराव शिंदे विरुद्ध विरोधक सामना यंदाच्या निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:31 PM2019-07-22T14:31:08+5:302019-07-22T14:34:09+5:30

माढा विधानसभा; भाजपकडून इच्छुक उमेदवारांची गर्दी; मोहिते- पाटील व परिचारक यांची भूमिका निर्णायक

Against Babanrao Shinde Opponent Match In this year's elections, coloring symbols also appear | बबनराव शिंदे विरुद्ध विरोधक सामना यंदाच्या निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे

बबनराव शिंदे विरुद्ध विरोधक सामना यंदाच्या निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे

Next
ठळक मुद्देसन १९९५ पासून आमदार बबनराव शिंदे माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेतप्रत्येक वेळी बहुरंगी लढत झाली आहे़ त्यामुळे विरोधी मतांची विभागणी होऊन आमदार शिंदे यांचाच फायदा झालाएकदा निवडणूक झाल्यानंतर पराभूत झालेले उमेदवार पुन्हा पाच वर्षे मतदारसंघात फिरकलेच नाहीत

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवू इच्छिणाºया भावी आमदारांची संख्याही उदंड झाली आहे. या मतदारसंघात कोणी कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवली तरी आमदार बबनराव शिंदे विरुद्ध त्यांचे सर्व विरोधक, असा सामना रंगणार आहे. यावेळी मोहिते-पाटील व परिचारक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे .

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्या पराभवामुळे व भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. मोहिते -पाटील यांचा भाजपशी घरोबा व माढा तालुक्यातील आमदार शिंदे यांच्या वेगवेगळ्या पक्षांतील सर्व विरोधकांनी भाजपशी साधलेली जवळीक यामुळे मागील पंचवीस वर्षांपासून सत्तेवर असलेले आमदार बबनराव शिंदे यांना प्रथमच बॅकफूटवर जावे लागले आहे.

या मतदारसंघात अगदीच नगण्य असणाºया भाजपमध्ये चैतन्य आले आहे. आमदार शिंदे यांच्यासह अनेकांनी भाजपचे कमळ हातात घेऊन उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. कोण कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबद्दल अनिश्चितता असली तरी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आमदार बबनराव शिंदे विरुद्ध त्यांचे विरोधक असा सामना रंगणार याबाबत कोणाचेही दुमत नाही .

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रथमच शिंदे यांचे सर्व विरोधक एकत्र करून विजय मिळविण्यात भाजप नेतृत्वाला यश आल्याने शिंदे बंधूंच्या विरोधकांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला केवळ ६५०० मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या पर्यायाने आमदार शिंदे यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी माढा तालुक्यातून राष्ट्रवादीला मिळालेले १७ हजार मताधिक्य विरोधकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. या सर्व पडझडीमुळे येणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे हे भाजप तसेच शिवसेना नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे .

भाजप-शिवसेनेची युती होणारच असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी दोन्ही पक्षांकडे चालू असलेले इनकमिंग व दोन्ही पक्षांची मुख्यमंत्री आपलाच असावा ही भूमिका लपून राहिली नसल्याने वरिष्ठ पातळीवर आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याची रणनीती आखली जात आहे. माढा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे. प्रा. तानाजी सावंत मंत्री झाल्यापासून कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडायची नाही अशी चर्चा सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्ते करीत आहेत. युती झाली तर सेनेकडे, नाही झाली तर भाजपकडे या भूमिकेतून प्रस्थापित नेते आपल्या सोंगट्या टाकत असल्याची चर्चा आहे.

लोकसभेतील विजयामुळे भाजपकडे उमेदवारी मागणाºयांची संख्या उदंड झाली आहे. माढ्याची जागा भाजपकडे आल्यास भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, माजी कृषी सभापती संजय पाटील- भीमानगरकर, कल्याणराव काळे, राजकुमार पाटील, भारत पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत. यामध्ये एकमत झाले नाही तर मात्र मोहिते-पाटील कुटुंबीयांतील कोणीही एकाने ही निवडणूक लढविली तर आश्चर्य वाटायला नको .

माढ्याची जागा सेनेकडेच राहिली तर मात्र पुन्हा एकदा प्रा. शिवाजी सावंत किंवा त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत सेनेचे उमेदवार असू शकतात. काही वेगळा निर्णय झाल्यास मात्र निवडून येण्याची क्षमता असणाºया प्रस्थापितांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची चर्चाही दोन्ही पक्षांत चालू आहे . माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हा संघटक तथा कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

प्रत्येकवेळी बहुरंगी निवडणूक
- सन १९९५ पासून आमदार बबनराव शिंदे माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रत्येक वेळी बहुरंगी लढत झाली आहे़ त्यामुळे विरोधी मतांची विभागणी होऊन आमदार शिंदे यांचाच फायदा झाला आहे. शिवाय एकदा निवडणूक झाल्यानंतर पराभूत झालेले उमेदवार पुन्हा पाच वर्षे मतदारसंघात फिरकलेच नाहीत, याचाही लाभ आमदार शिंदे यांनाच झाला आहे.

Web Title: Against Babanrao Shinde Opponent Match In this year's elections, coloring symbols also appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.