अक्षय्य तृतीयेसाठी घरी येणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला, कार अपघातात दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:13 AM2018-04-18T08:13:34+5:302018-04-18T08:13:34+5:30
परीक्षेचे कामकाज संपवून अक्षय्य तृतीयेला घरी येणाऱ्या शिक्षकांवर काळाने घाला घातला.
सोलापूर : परीक्षेचे कामकाज संपवून अक्षय्य तृतीयेला घरी येणाऱ्या शिक्षकांवर काळाने घाला घातला. तामलवाडी (ता. तुळजापूर ) येथील कटारे स्पिनिग मिल जवळ झालेल्या अपघातामध्ये दोघे प्राध्यापक ठार झाले तर एक प्राध्यापक गंभीर जखमी आहे. गंगामाई या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेखर कुलकर्णी (वय 53 रा,जुळे सोलापूर), प्रवीण दुस्सा(वय 30 रा, अशोक चौक, सोलापूर), आणि संदीप मेटकरी(वय 36 रा दमानी नगर सोलपूर) हे तिघे उस्मानाबाद गव्हर्नमेंट पौलिटेक्निक महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दुपारी परीक्षेचे कामकाज संपवून अक्षय तृतीयेला घरी येण्यासाठी रात्रीच्या सुमारास सोलापूरकडे खासगी कारने निघाले होते. तामलवाडी पर्यंत त्यांचा प्रवास सुखरूप झाला. परंतु कटारे स्पिनिग मिल जवळ चुकीच्या दिशेने येणारा टेम्पो वेगात येऊन त्यांच्या गाडीला धडकला. अपघात एवढा भीषण होता की, शेखर कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चक्काचूर झाला. तर प्रवीण दुस्सा यांचा गंगामाई हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. संदीप मेटकरी हे गंभीररित्या जखमी असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
शेखर कुलकर्णी आणि संदीप मेटकरी हे उस्मानाबाद तंत्रनिकेतन मध्ये मेकॅनिकल विषयाचे प्राध्यापक होते. प्रवीण दुस्सा सिव्हिल इंजिनियरींगचे विषय शिकवत होते. अपघाताची बातमी समजताच कॉलेजचे शिक्षक गंगामाई हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.