बनावट रंग विक्री प्रकरणी एजंटाला गुजरातमधून अटक
By दिपक दुपारगुडे | Published: July 13, 2023 06:54 PM2023-07-13T18:54:40+5:302023-07-13T18:55:03+5:30
करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील दुकानदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दीपक दुपारगुडे, सोलापूर : बनावट रंग विक्री प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीलाही करमाळा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल करमाळा पोलिसात करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील दुकानदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात दिल्ली येथील संबंधित कंपनीचे आनंद राधेश्याम प्रसाद (वय २७) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दिनेश हुकुमचंद मुथा (रा. करमाळा) व योगेश फुलाणी (रा. गुजरात) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये तीन लाख ३६ हजार १ रुपयांची फसवणूक झाली. यातील संबंधित बनावट रंगाचे डबे जप्त करून पोलिस गुजरात येथील आरोपीचा शोध घेत होते. संबंधित रंग हा गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराने गुजरातमधून घेतला होता. तेथील संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्हा दाखल होताच करमाळा पोलिसांचे पथक गुजरात येथे रवाना झाले होते. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलिस हवालदार अजित उबाळे व चेतन पाटील यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.