सोलापुरात मराठा समाज आक्रमक; राणे, सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; गावागावात मुंडन आंदोलन
By Appasaheb.patil | Published: October 29, 2023 11:44 AM2023-10-29T11:44:25+5:302023-10-29T11:45:25+5:30
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील साखळी उपोषण सुरू आहे.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. रविवारी सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातीत कोंडी, कारंबा, कळमण गावात मराठा समाज बांधवांनी मुंडन आंदोलन केले. याशिवाय तिऱ्हे गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे, ॲड. गुणवर्ते सदावर्ते यांच्या प्रतिमेची भर चौकातून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणात मराठा समाजासह विविध समाजातील मान्यवर, संघटना, संस्था प्रतिनिधी तसेच राजकीय नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहर परिसरातील विविध भागातील समाज बांधव साखळी पद्धतीने उपोषणस्थळी हजेरी लावत आहेत. ग्रामीण भागात देखील उपोषणासह विविध आंदोलने सुरू आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा, कोंडी यासह आदी गावात मुंडन आंदोलन केले. याशिवाय जिल्ह्यातील विविध गावात राजकीय लोकप्रतिनिधींना गावबंदीचा करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून विविध ठिकाणी आक्रमक आंदोलनं सुरू करण्यात आली आहेत.