टेंभुर्णी पोलिसांविरोधात चौथ्या दिवशीही आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:23+5:302021-06-06T04:17:23+5:30
टेंभुर्णी : येथील अमानवी कृत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात ...
टेंभुर्णी : येथील अमानवी कृत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीवर तक्रारदार संघटना कायम असून, सलग चौथ्या दिवशी टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू ठेवले आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या महिला व पुरुषांना घरातून बोलावून आवारातील मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठा हाताने उचलावयास लावल्या प्रकरणाची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची उचलबांगडी करून त्यांची नेमणूक पंढरपूर मंदिर सुरक्षा पथकात केली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचा कार्यभार करमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे.
याप्रकरणी सलग चौथ्या दिवशी लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल आरडे, भीम क्रांती मोर्चाचे अध्यक्ष महावीर वजाळे, मोहन कांबळे, राहुल कांबळे, रणधीर जगताप आदी कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे दोन दिवसांपासून विविध स्तरावर प्रयत्न चालू असून, ते मात्र स्वत:च्या भूमिकेवर ठाम आहेत.
---
पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची झालेली बदली कारवाई, ही पुरेशी नसून त्यांनी केलेल्या अक्षम्य चुकीबद्दल आठ दिवसांत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात यावे, अन्यथा १२ जून रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू.
- रामभाऊ वाघमारे
जिल्हाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन
---
फोटो : ०५ टेंभुर्णी
धरणे आंदोलनास बसलेले अनिल आरडे, मोहन कांबळे, राहुल कांबळे, महावीर वजाळे.