चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवेबाबत दोन दिवसात बैठक न झाल्यास आंदोलन
By दिपक दुपारगुडे | Published: March 21, 2023 12:26 PM2023-03-21T12:26:42+5:302023-03-21T12:27:29+5:30
शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.
दीपक दुपारगुडे, सोलापूर: चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी अक्कलकोटसह, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी मोबदला मिळाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले होते. यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन या कामाला स्थगित देत असल्याचे सांगून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक लावणार असल्याचे जाहीर केले होते. बैठक होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप बैठकीचे निमंत्रण समितीला देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोज या विषयाबाबत विचारणा होत आहे. प्रशासनाचे कामकाजही सुरूच आहे. हायवेसंबंधी विविध कारवाया सुरूच आहेत.त्यामुळे आता संबंधितांनी याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यावेळी विश्वनाथ भरमशेट्टी, स्वामीनाथ हरवाळकर, दिपक पवार, मल्लिनाथ म्हेत्रे, कालिदास वळसंगे, भीमाशंकर बनने, सादिक बांगी, केदार माळी आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"