ग्रामसेविकेच्या निलंबनासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:26 AM2021-08-27T04:26:15+5:302021-08-27T04:26:15+5:30
बीडीओंनी दिला निलंबनाचा प्रस्ताव बार्शी : सौंदरे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका एस. पी. नागरगोजे यांना निलंबित करा, या मागणीसाठी बार्शी युवक ...
बीडीओंनी दिला निलंबनाचा प्रस्ताव
बार्शी : सौंदरे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका एस. पी. नागरगोजे यांना निलंबित करा, या मागणीसाठी बार्शी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के व तक्रारदार ओमप्रसाद अनपट यांनी पंचायत समिती कार्यालया समोर १५ फूट उंचीच्या मनोऱ्यावर बसून धरणे आंदोलन केले.
यावेळी तक्रारदार ओमप्रकाश अनपट, काँग्रेसच्या निवेदिता आरगडे, ललिता अनपट, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केशव मुकटे, सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.विजय साळुंके, युवक अध्यक्ष संतोष शेट्टी उपस्थित होते.
ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीवर ललिता अनपट यांचे भोगवटादार म्हणून रजिस्टरवर असलेले नाव सौदरेच्या ग्रामसेविका नागरगोजे यांनी काढून कोरा उतारा तयार केला आणि इतरांना खरेदी करण्यासाठी दिला. त्यामुळे अनपट परिवार बेघर झाले. हा प्रकार समजताच अनपट यांनी ग्रामसेविका नागरगोजे विरोधात लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. गटविकास अधिकारी यांनी चौकशी अधिकारी नेमून प्रस्ताव मागितला होता. या प्रकरणात ग्रामसेविका या दोषी असल्याचे दिसून आले परंतु मागील सहा महिन्यांपासून पंचायत समितीचे अधिकारी हे वेळेत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नागरगोजे यांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव दिला तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव मिळाला असून कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आले.
---