Agriculture; अनुकूल हवामानामुळे यंदा आंब्याला उशिरा मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:37 PM2019-02-09T16:37:43+5:302019-02-09T16:40:06+5:30
सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला ...
सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला मोहोर आला असला तरी सध्या स्वच्छ हवामानामुळे परिस्थिती चांगली दिसत आहे.
पाऊसकाळ भरपूर झाला व थंडी पडली की आंब्याला दरवर्षी आॅक्टोबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते. पण यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामानाने आॅक्टोबरपासून थंडीचा प्रभावही कमी जाणवला. त्यामुळे आंब्याला मोहोर आलाच नाही. शेतकºयांनी यंदा दुष्काळी स्थितीमुळे आंब्याला मोहोर येणार नाही असा अंदाज बांधला होता. पण जानेवारीत पडलेल्या थंडीमुळे आंबा बहरू लागला आहे. जवळजवळ दोन महिने उशिराने आंबा मोहोरला आहे. जिल्ह्यात सगळीकडे आंब्याची झाडे मोहोरताना दिसत आहेत. आंबा मोहोरला असला तरी त्यावर बुरशीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोर गळून चालला आहे. फळ धरलेली काडी काळी पडून गळून चालल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंब्याची झाडे मोहोरली असली तरी मोहोर गळाचे प्रमाण भरपूर असल्याने यावर उपाययोजनांबाबत शेतकरी अनभिज्ञ दिसत आहेत. आंब्याची झाडे मोठी व दुष्काळी स्थितीतील वाईट हवामानामुळे मोहोर गळाची स्थिती राहणार अशी शेतकºयांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे मोहोर गळणे व बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत कृषी खात्याने जनजागृती करावी अशी मागणी होत आहे.
बुरशीबाबत घ्या काळजी
- यंदा आंब्याला मोहोर येण्यास थोडा विलंब झाला तरी झाडे बहरली आहेत. सध्या आंबा मोहोरण्यास हवामान अनुकूल आहे. मोहोर गळबाबत काळजी नको. मोहोरचे प्रमाण खूपच जास्त आहे,झाडाच्या ताकदीप्रमाणे ही गळ नैसर्गिक आहे. मोहोरवर बुरशी दिसत असेल तर बुरशीजन्य कीटकनाशकाचा एक फवारा घ्यावा, लागलीच बंदोबस्त होईल असा सल्ला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिला आहे.