कृषीमंत्री दादाजी भुसे सोलापूर दौऱ्यावर; अचानक दौऱ्याने प्रशासनाची उडाली धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:53 PM2020-06-22T12:53:57+5:302020-06-22T12:56:52+5:30
लोकमत इफेक्ट; बोगस खत प्रकरणाचा घेणार आढावा
सोलापूर: राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे सोमवार दि. २२ जून रोजी दुपारी चार वाजता सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात बोगस रासायनिक खताचे रॅकेट उघड झाले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर केल्यानंतर कोल्हापूरच्या टोळीने सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस रासायनिक खत घुसवले होते. शेतकरी खरीप हंगामाच्या धांदलीत असताना घाईगडबडीत अशा बोगस खतांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू होती. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 'लोकमत'ने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मीठ, या वृत्त मालिकेद्वारे यावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत कृषिमंत्र्यांनी हा अचानक दौरा ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.
कृषिमंत्र्यांच्या अचानक दौऱ्याने जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. बीड, उस्मानाबादनंतर मोटारीने दुपारी चार वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत.