आमदारांना अडवलं.. मंत्रीही बाहेरच; पहाटेच्या पूजेवेळी मानापमान नाट्य, मंदिराबाहेर धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 09:11 AM2023-06-30T09:11:01+5:302023-06-30T09:40:46+5:30
सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. कृषिमंत्र्यांनाही बाहेर थांबविले.
सोलापूर : गुरुवारी पहाटे विठ्ठल मंदिरात शासकीय पूजेदरम्यान मंदिराबाहेर ('श्री'चा नैवेद्य दरवाजा, क्रमांक-०८) राजकीय मानापमान नाट्य घडले. पूजेदरम्यान मंदिरात प्रवेश करण्यासाठी काही आमदारांची धडपड सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहपरिवारासह मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत मंदिरात घुसण्यासाठी अनेकजण धडपडले. सुरक्षारक्षकांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे काही आमदार चिडले. मंत्र्यांनाही बाहेर थांबविले.
मंत्री दादा भुसे यांचे आगमन झाले. दरवाजा बंद असल्याने आत आपल्याला प्रवेश मिळणार नाही, हे लक्षात येताच ते बाहेर गर्दीतच थांबून राहिले. यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. परंतु ते कोणालाही काही बोलले नाहीत. मंत्री दादा भुसे हे बाहेर थांबून आहेत, असे काही लोकांनी सुरक्षारक्षकांना सांगितले. तरी त्यांचे लक्ष दादा भुसेंकडे गेले नाही. सात ते आठ मिनिटांनंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा उघडून दादा भुसे यांच्यासह काही लोकांना घेतले.
गुरुवारी मध्यरात्री दीडचे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या परिवारासह विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. या दरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मंत्री, आमदार तसेच अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. याच दरम्यान काही लोकांनी मंदिरात येण्यासाठी खूप धडपड केली. यावेळी आत येणारे नागरिक तसेच पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली.
पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी मंदिरातच थांबून होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा स्ट्रॉंग राहिली. मुख्यमंत्री आत शासकीय पूजा करत असताना मंदिरात जाण्यासाठी अनेक लोकांकडून प्रयत्न सुरू होते. परंतु, पोलिस विभागाने काही मोजक्याच आजी-माजी मंत्र्यांना, आमदार तसेच नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला. बाकीचे दरवाजाबाहेर थांबून राहिले. त्यामुळे गेट क्रमांक आठच्या बाहेर गर्दीच गर्दी होती. या ठिकाणी धक्काबुक्कीदेखील झाली. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मंदिरातील दरवाजा बंद केल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांना बाहेरच थांबून राहावे लागले होते.
पालकमंत्र्यांनी घेतली भाविकांची काळजी
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बराचवेळ गेट बाहेर थांबून राहिले. गर्दी कमी करण्यासाठी ते भाविकांना आवाहन करत होते. मंदिर परिसरातून ये-जा करणाऱ्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. गर्दीत घुसणाऱ्या व गर्दीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना ते शांततेचे आवाहन करत होते. 'हळू चला, काळजी घ्या, समोर पायऱ्या आहेत, पडाल...' अशा सूचना देत त्यांनी भाविकांची काळजी घेतली. एकीकडे मंदिरात घुसण्यासाठी सर्वजण धडपड करत होते तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी मंदिराबाहेर थांबून भाविकांची काळजी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले.