अहो...शाळेत दिलेली दाळ शिजेना; काय आहे गौडबंगाल वाचा सविस्तर बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:53 AM2020-09-15T11:53:26+5:302020-09-15T11:57:14+5:30
शालेय पोषण आहाराचा बोजवारा मुगाबरोबर हरभरा डाळही निकृष्ट; अधिकाºयांच्या पाहणीनंतर अन्न व औषध विभागाने घेतले नमुने
सोलापूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यात येणाºया मूगडाळीबरोबर चनाडाळही निकृष्ट असल्याचे शिक्षण अधिकाºयांच्या पाहणीत आढळले आहे. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुगाच्या डाळीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना योजना राबविण्यात येत होती. पण सध्या कोरोना साथीमुळे शिजविलेला आहार देण्याऐवजी तांदूळ, चना व मूगडाळ विद्यार्थ्यांना दिली जात आहे. धान्य वाटपाचा शासनाने संस्थांना ठेका दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या आहारातील मूगडाळ निकृष्ट असल्याची पालकांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने याची शहानिशा केली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले की, बातमीच्या अनुषंगाने मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन शाळांना भेटी देऊन आहाराची खातरजमा केली. ठेकेदाराने पॅकिंगमध्ये पुरविलेली मूगडाळ निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत संबंधित ठेकेदारांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ज्या भागात अशी डाळ वाटप झाली ती तातडीने बदलून देण्याचे सांगण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वृत्ताची अन्न व औषध प्रशासनानेही दखल घेतल्याचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. अन्न निरीक्षक देशमुख यांना या डाळीचे नमुने तपासणीसाठी घेण्याची सूचना केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला किचनबाबत परवाना घेण्याचे कळविले आहे.
यंदा कोरोना साथीमुळे किचन बंद असल्याने परवानगीसाठी अर्ज आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाºया आहारामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होत असेल तर याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
आता चना डाळीच्या तक्रारी
मूगडाळ निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर शहरातील पालक व शिक्षकांनी चना डाळही निकृष्ट असल्याचे कळविले आहे. याबाबत तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.