अहमद जकेरिया करणार विजापूर वेस चौक चकाचक; छत्रपती, बाबासाहेबांचा पुतळा परिसरही लख-लख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:53 AM2020-01-08T11:53:20+5:302020-01-08T11:54:44+5:30
सोलापूर सिध्देश्वर यात्रा; प्रत्येक मार्ग घेण्याची एकेकाची जबाबदारी : छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळा परिसरातही विद्युत दिव्यांचा झगमगाट
सोलापूर: ग्राफिक डिझायनर असलेले अहमद जकेरिया यंदा विजापूर वेस चौकातील पोलीस पॉइंटजवळ भक्तगणांची सेवा बजावणार आहेत. स्वच्छता मोहिमेने परिसर चकाचक करण्याबरोबर भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करणार आहेत. नगरसेवक आनंद चंदनशिवे हे प्रबुद्ध भारत ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अन् महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर उजळून टाकणार आहेत.
गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेत विजापूर वेस परिसरातील अनेक व्यापाºयांनी योगदान दिले होते. यंदा आपले योगदान राहावे यासाठी स्वागत कमानही उभी करणार असल्याचे जकेरिया यांनी सांगितले. गेल्या वर्षाप्रमाणे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यंदाही प्रकाशमय यात्रेत पुढाकार घेतला आहे.
शहराच्या प्रवेशद्वारावरही विद्युत रोषणाई
- जुना पुणे नाका म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा परिसर. पुण्याहून सोलापुरात येणारा प्रवेशद्वार म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसरातील छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा परिसर आणि सुशोभीकरण केलेल्या गार्डनमध्येही विद्युत दिव्यांचा झगमगाट दिसणार आहे. यासाठी पी. बी. ग्रुपने पुढाकार घेतल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. इतर प्रभागातील नगरसेवकांनीही प्रकाशमय यात्रेत योगदान बजावावे, असे आवाहनही त्यांनी केले़
मार्कंडेय मंदिरावरही विद्युत रोषणाई- सुरेश फलमारी
च्पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मार्कंडेय मंदिरासमोरुन मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने जात असतात. या नंदीध्वजांचे स्वागत पद्मशाली समाजाकडून केले जाते. गेल्या वर्षी श्री मार्कंडेय मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. यंदाही मंदिर उजळून टाकणार असल्याचे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलमारी यांनी सांगितले. यंदा ‘लोकमत’च्या दीपोत्सवातही श्री मार्कंडेय जनजागृती संघाने घेतलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा ‘लोकमत’च्या दीपोत्सवात सहभागी होण्याचे पुण्य लाभले. महालक्ष्मी दुग्धालय ते टोळांचा बोळपर्यंतच्या मार्गावरील दुतर्फा विद्युत रोषणाई करुन प्रकाशमय यात्रेला गती देणार आहे. मीही सहभागी झालो. आपणही व्हा.
-अजित खाडिलकर,
सराफ व्यापारी.
कधी नव्हे ती गेल्या वर्षापासून प्रकाशमय यात्रेची सुरुवात झाली. सोलापूरच्या ब्रॅण्डिंगसाठी ‘लोकमत’ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. फलटण गल्ली ते मंगळवार पेठ पोलीस चौकीपर्यंतचा मार्ग मी उजळून टाकणार आहे.
-पापाशेठ दायमा, व्यापारी.
प्रकाशमय यात्रेची संकल्पना मांडत ‘लोकमत’ने जुन्या परंपरेला उजाळा दिला. प्रत्येक घटक सहभागी होत असताना आपणही मागे राहू नये, म्हणून मी हिरामोती चौक ते कस्तुरबाई मंडईपर्यंतचा मार्ग विद्युत दिव्यांनी सजवणार आहे.
-प्रवीण शिरसी, व्यापारी.
सोलापूर ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहत असताना ग्रामदैवताची यात्रा प्रकाशमय करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विजापूर वेस चौकातील पोलीस पॉइंटचा परिसर स्वच्छ करुन भक्तांसाठी पाण्याची सोय करणार आहे.
-अहमद जकेरीया, ग्राफिक डिझायनर.