१५ आॅगस्टपासून विमानसेवा
By admin | Published: July 13, 2014 01:18 AM2014-07-13T01:18:59+5:302014-07-13T01:18:59+5:30
सर्व संबंधितांची बैठक : विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुढाकार
सोलापूर : बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हाकेला ओ देऊन ‘सुप्रीम एअरलाईन्स’ ही कंपनी पुढे आली असून, १५ आॅगस्टपासून नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाल्याचे मोहिते-पाटील यांनी आज शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत उपस्थित झालेल्या बैठकीत जाहीर केले़
व्यापारी, उद्योजक वर्गातून विमानसेवेची मागणी केली जात आहे़ खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे विमानसेवा सुरू करण्याचा आग्रह धरला होता़ त्यानुसार खा़ मोहिते-पाटील यांनी ‘सुप्रीम एअरलाईन्स’ या खासगी विमान कंपनीशी त्यांनी चर्चा केली़ कंपनीचे अमित अग्रवाल यांनी सोलापूरसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे़ ही माहिती देत १५ आॅगस्टपासून ही विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा मोहिते-पाटील यांनी केली़
सोलापूर-मुंबईसाठी नियमित ९ सीटचे विमान ही सेवा देणार आहे़ गरजेनुसार विमानाच्या फे ऱ्या किंवा अतिरिक्त विमान उपलब्ध करण्यात येणार आहे़ छोटे विमान उतरण्यासाठी जुहू विमानतळ सोयीचे आहे़ जास्त प्रवासी क्षमतेचे विमान सांताकू्रझ विमानतळावर उतरविण्यासाठी सिग्नलची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे़ त्यामुळे कमी प्रवासी क्षमतेचे विमान तूर्तास ही सेवा देणार आहे़ गरजेनुसार त्यात वाढ होण्याची शक्यता आहे़ विमानभाडे ५,५०० रु़(अंदाजे) असून, सेवा सुरू होण्यासाठी डीजीसीए (डायरेक्टर जनरल आॅफ एव्हिएशन) कडून अंतिम मान्यता आवश्यक आहे़ ती प्राप्त होताच सेवा सुरू होईल, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले़
पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी होटगी रोडच्या विमानतळाचे पोलीस आॅडिट केल्याचे सांगताना काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला केल्या आहेत़ ही बाब नजरेस आणून दिली़ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधीक्षक संतोष कौलगी यांनी त्यासाठी ४५ दिवसांची मुदत मागितली़
महापौर अलका राठोड यांनी विमानसेवेच्या निर्णयाचे स्वागत केले़ सोलापुरात थीम पार्क उभारत असल्याने नवी विमानसेवा पूरक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले़ उद्योजक केतन शहा, विश्वनाथ करवा, पेंटप्पा गड्डम, लोटस हॉटेलचे प्रितीश शहा यांनी मोहिते-पाटील यांना धन्यवाद दिले़ विमानसेवेसंदर्भात काही सूचना केल्या़ त्यात प्रवासी क्षमता, विमानांची जाण्या-येण्याची वेळ, प्रवासीभाडे आदींचा समावेश आहे़ उपस्थित उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या भावना मोहिते-पाटील यांनी विमान कंपनीचे प्रमुख अग्रवाल यांना मोबाईलवरून कळविल्या़
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मनपाचे सहायक आयुक्त पंकज जावळे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, बांधकाम खात्याचे शिंदे, विमानतळाचे प्रभारी अनिल श्रीवास्तव, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, उद्योजक जितेंद्र राठी, बाबुराव घुगे, कय्युम बुऱ्हाण, भूविकास बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत घोडके, जि़ प़ सदस्य उमाकांत राठोड, शफी इनामदार, एम़ डी़ शेख, चेंबरचे माजी सचिव केतन शहा, विश्वनाथ करवा, बशीर शेख, नंदू आहुजा, उमेश ऐनापुरे, राजगोपाल झंवर, प्रथमचे उल्हास सोनी, त्रिपुरसुंदरीचे राकेश कटारे, रुबी ट्रॅव्हलचे आसिफ शेख, चेंबरचे एऩ आऱ पाठक, कुशल शहा आदी उपस्थित होते़
------------------------------
अशी असेल विमानसेवा
सोलापूर-मुंबई दररोज फेरी
प्रवासी क्षमता - ९
प्रयाण - सकाळी ८ वा़, आगमन- सायंकाळी ५ वा़
मागणीनुसार वेळेत बदल होण्याची शक्यता
प्रवासीभाडे ५,५०० (अंदाजे)
गरजेनुसार फेऱ्यांत वाढ, संख्याही वाढेल