अवघ्या २४ व्या वर्षी आयेशा बनली न्यायाधीश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:38 AM2019-12-23T11:38:54+5:302019-12-23T11:40:57+5:30

तोळणूरसह अक्कलकोटमध्ये आनंदोत्सव; आयेशा यांनी परिस्थिती अन् संकटावर केली मात

Aisha becomes judge at the age of 8 ... | अवघ्या २४ व्या वर्षी आयेशा बनली न्यायाधीश...

अवघ्या २४ व्या वर्षी आयेशा बनली न्यायाधीश...

googlenewsNext
ठळक मुद्देअक्कलकोटपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावरील तोळणूर गावकर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचणजिद्द न सोडता आयेशा यांनी सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला

बऱ्हाणपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तोळणूर (ता. अक्कलकोट) या छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या कन्येने यश मिळविले. आयेशा पिरजादे असे त्या कन्येचे नाव. आयेशा या अवघ्या २४ वर्षांच्या आहेत. 

अक्कलकोटपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावरील तोळणूर गाव़ कर्नाटक सीमा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गावात भाषेची अडचण. गावात फक्त १० वी पर्यंतच शिक्षणाची सोय. त्यामुळे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं; मात्र जिद्द न सोडता आयेशा यांनी सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षे विधीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. राज्यभरातून १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. अंतिम यादीत केवळ १९० विद्यार्थ्यांची परीक्षा झाली़ त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

आयेशा पिरजादे यांचे वडील अजीजपाशा पिरजादे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गावात असलेली शेती हेच अर्थार्जनाचे साधन. त्यांना पाच मुली आहेत; मात्र परिस्थिती समाधानकारक नसतानाही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले नाही. पाचपैकी चार मुली या उच्चशिक्षित आहेत. त्यांची पाचवी मुलगी शिक्षण घेत आहे. सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीतही उत्पन्न मिळत नाही. कुटुंबाची बिकट परिस्थिती असतानाही मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केले नाही.

याच परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आयेशा यांनादेखील शिकवले. या कष्टाचं फलित झालं. या यशानंतर संपूर्ण परिवार आनंदात असल्याचे दिसून आले. आयेशा यांच्या यशाने नातेवाईकांसह ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.

मुस्लीम परिवारामध्ये सहसा मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केलं जात नाही; मात्र वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले आहे. - आयेशा पिरजादे


मुलींना दुय्यम स्थानी समजणाऱ्या लोकांसाठी हे यश दिशा देणारे आहे. पाच मुली असतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने हे यश दिसत आहे. फक्त कुटुंबातीलच नाही तर गावातील पहिली न्यायाधीश मुलगी झाल्याने अतिशय आनंदी आहे.  

- अजीजपाशा पिरजादे, वडील

मुलगी असूनही आयेशा यांनी गावचे नाव रोशन केले. कमी वयात न्यायाधीश होऊन तालुक्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी दाखवून दिली. कमी शेती असतानाही मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या अजीजपाशा पिरजादे यांचे अभिनंदऩ मुली सक्षम झाल्या तरच राष्ट्राची प्रगती होईल़
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार

Web Title: Aisha becomes judge at the age of 8 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.