कारखाने सहकारी असो वा खासगी चालवायला धमक लागते - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:06 PM2019-04-06T12:06:20+5:302019-04-06T12:08:39+5:30
मोहिते-पाटील यांचे नाव न घेता माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली टीका.
माळशिरस : बँका, पतसंस्था चालवता आल्या नाहीत. स्वत:चे व सहकारी साखर कारखाने चालवता आले नाहीत. ज्याच्या अंगात धमक असते तो कारखाना चालवू शकतो, अशी टीका मोहिते-पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आ. रामहरी रूपनवर, आ. बबनराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, उमेदवार संजय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, शंकर देशमुख, पांडुरंग देशमुख उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, दूध संस्था, कारखाने, बँका आपल्या हातात आहेत. त्या माध्यमातून शेतकºयाला कर्ज द्यायचं, त्याच्या उताºयावर बोजा टाकायचा व त्यानंतर इकडेतिकडे गेले की तुझा सात-बारा आमच्या हातात आहे, अशी भीती घालायची, अशा पद्धतीचे राजकारण सुरू आहे. आम्ही मात्र अनेकांना राजकीय पदे दिली. एक रुपया खर्च न करता खासदारकी दिली, आमदारकी दिली. ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व केल्या होत्या. तरीही काही नेतेमंडळी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव पुढे घेऊन येतात, मात्र आम्हाला पण सगळं माहिती आहे.
एकदा तर कोणी म्हणाले, उजनी धरणातील वाळू विकून टाकू़ ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मांडण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही पतसंस्थांचे खेळखंडोबा केले ते काय आम्ही केले का? तुम्ही किती लोकांना रस्त्यावर आणलं? कितीतरी लोकांची आज दयनीय अवस्था केली? तालुक्यात सध्या आई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना, अशी स्थिती शेतकºयांची झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
नातेपुतेत जुन्या नेत्यांनी फिरविली पाठ, तरुणांनी केले स्वागत
- - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नातेपुते येथे जाताना धावती भेट दिली़ मात्र त्यांच्या स्वागताकडे जुन्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ त्यामुळे अक्षय भांड यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले़
- - कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप सरकार हे दुष्काळ व शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे कर्जबाजारामुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे़ शेतात पाणी नसल्याने शेतकरी बोअरवेल घेतो, पण पाणी लागत नाही, कोणत्याही शेतमालाला भाव नाही़ मुलगी लग्नाला आलेली आहे पण पैसा नाही, अनेक संकटांना शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे़ याला शासनच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले़
- - सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण शासनाने अजूनही पाण्याचा टँकर, चारा छावणी सुरू केल्या नाहीत़ याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले़
दीपक आबांना केस सांभाळण्याचा सल्ला
- - कुणी तरी एकच खासदार होणार ना? दीपक आबांना, माणवाल्यांना त्यांना वाटत होतं आपणाला मिळंल, मात्र शरद पवार यांनी संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. करमाळा आता रश्मी दीदीला मोकळा झाला आहे़ त्यामुळं दीपक आबा! सांगोल्यावर लक्ष द्या, नाही तर आपले राहिलेत तेवढे केस राहणार नाहीत, असा मिस्कील फटकारा लगावला़ माण आणि फलटणची काळजी करू नका. कुठेही गाफील राहू नका़ काहीही अफवा उठवल्या जातील, तिथे येतो़़ पुढं. कुठे गेला यावर अजिबात लक्ष ठेवू नका, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मूळ दावणीला आल्यास त्यात गद्दारी कसली ?
- - संजयमामाला गद्दार म्हणतात, त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला होता का? स्वत:च्या हिमतीवर निवडून आले व पाठिंबा घेऊन जिल्हाध्यक्ष झाले़ ते ज्या पक्षातून गेले त्या पक्षात माघारी आले, यात काय चूक झाली़ ज्या दावणीला होते त्याच दावणीला परत आले यात कसली गद्दारी?