ईडी कारवाईच्या भितीनेच अजित पवारांचा निर्णय; सुजात आंबेडकर स्पष्टच बोलले
By Appasaheb.patil | Published: July 2, 2023 07:29 PM2023-07-02T19:29:41+5:302023-07-02T19:30:16+5:30
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे.
सोलापूर : ईडी कारवाई व सोळा आमदारांच्या अपात्रेच्या भितीनेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची टिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली.
सोलापुरात एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर आल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. सोलापुरात एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर हे रविवारी आले होते. त्यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रागृहात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, अझरुद्दीन शेख, विनोद जाधव, अमर डूरके, प्रेम सिद्धगणेश, जगुसिंग टाक, विनोद इंगळे, अनिरुद्ध वाघमारे, राजरत्न फडतरे, विक्रांत गायकवाड आदी उपस्थित होते.
ईडीची कारवाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पक्ष चिन्ह भेटू नये व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाच्या भीतीने राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह अन्य नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उरकला. अजित पवारांनी बंड केले, राष्ट्रवादी फुटली असे न म्हणता सरळ सरळ राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारला उघड पाठिंबा दिला, तो पक्षाचाच निर्णय असावा. पहाटेच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा होता आणि आता दुपारच्या शपथविधीलाही राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, फुले - शाहू- आंबेडकर यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात पुरोगामी, समाजवादी असल्याचा नारा देत राजकारण करणाऱ्यांचं खरा चेहरा पुढे आला आहे. यापूर्वी ते छुपा पाठिंबा देत होते. ते आता उघडपणे पाठिंबा देत आहेत. देशात लोकशाही व संविधान मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांना साथ देण्यात येत आहे. साथ देण्याचा निर्णय तथाकथित समाजवादी पुरोगामी पक्षाने घेतला. भाजपाला बळकटी देणारी ए, बी, सी टीम कोण ? हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलेले आहे. राजकारणातील हे आजचे शेवटचे वळण नव्हे तर यापुढेही वेगळे चित्र दिसणार असल्याचेही ते म्हणाले.