अजित पवारांचा माईंड गेम... शहरातील प्रमुख नेत्यांच्या थेट घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:27+5:302021-04-10T04:22:27+5:30
माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे मागील अनेक वर्षांपासून परिचारक गटाचे काम करत आहेत. दिवंगत भारत भालके यांच्या गटाकडे पंढरपूर ...
माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे मागील अनेक वर्षांपासून परिचारक गटाचे काम करत आहेत. दिवंगत भारत भालके यांच्या गटाकडे पंढरपूर नगरपरिषदेची सत्ता गेली होती. त्यानंतर नागेश भोसले यांनी भालके गटांच्या नगरसेवकांना फोडून पुन्हा परिचारकांकडे नगरपरिषदेची सत्ता खेचून आणली. त्यावेळी नगराध्यक्षपद नागेश भोसले यांच्या पत्नी साधना भोसले यांना मिळाले. अडीच वर्षांनंतर साधना भोसले जनतेतून निवडून येऊन पुन्हा नगराध्यक्षा झाल्या. मागील साडेसात वर्षांपासून त्या सत्तेत आहेत; परंतु आ. प्रशांत परिचारक गटाला या पोटनिवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याचे कारण पुढे करत नागेश भोसले यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परिचारकांच्या सांगण्यावरून त्यांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे ते भाजपावर नाराज असल्याचे उघड दिसून आले होते. याचा फायदा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगिरथ भालके यांच्यासह थेट भाेसले यांचे घर गाठले. या सदिच्छा भेटीत पवारांनी भालकेंना मदत करावी, असा शब्द टाकला.
त्याचबरोबर परिचारक गटाचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्याही घरी पवार गेले. त्यांनी यावेळी समाजातील सर्व प्रश्न मार्गी लावू; परंतु निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत करा, असा शब्द टाकला. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांचीही अजित पवार यांनी भेट घेतली आहे. यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात अजित पवार यांनी भेट घेतलेले नेते नेमके भाजपाचे की राष्ट्रवादीचे काम करतील असा संभ्रम नागरिकांमध्ये झाला आहे.
सुरेश नेहतराव यांना फोडले
भाजपाचे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून नेहतराव परिवाराची ओळख आहे. नगरसेवक सुरेश नेहतराव सध्या परिचारक गटाचे काम करत होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूर-मंगळवेढ्यात दोन दिवस तळ ठोकून आहेत. या दरम्यान सुरेश नेहतराव यांनी परिचारक गटापासून लांब होत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मनसे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या घरी उपमुख्यमंत्री
परिचारकांच्या नेत्यांच्या घरी भेट दिल्याप्रमाणे अजित पवार यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याही घरी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी धोत्रेंच्या कार्यकर्त्यांची देखील विचारपूस केली. शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी गरज भासल्यास सांगा, प्रश्न मार्गी लावू असे पवारांनी धोत्रेंना सांगितले. मात्र, या भेटीमागचा उद्देश फक्त भगिरथ भालकेंना मदत व्हावी, एवढाच असल्याचे दिसून आले.
फोटो ::::::::::::::::::
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करत आहेत.