अजितदादा आज पंढरपुरात; दोन दिवस ठाण मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:40+5:302021-04-08T04:22:40+5:30

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे प्रमूख नेते मतदारसंघात ठाण मांडून ...

Ajitdada in Pandharpur today; I will stay for two days | अजितदादा आज पंढरपुरात; दोन दिवस ठाण मांडणार

अजितदादा आज पंढरपुरात; दोन दिवस ठाण मांडणार

Next

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे प्रमूख नेते मतदारसंघात ठाण मांडून आहेत. येत्या काही दिवसांत भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभाही होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडूनही यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील आदी नेते मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आता त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरला दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात भाजपचे नेते कल्याणराव काळे यांच्यासह काही प्रमुख नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. पंढरपूर, मंगळवेढा शहरांसह काही प्रमुख मोठ्या गावांत या दोन दिवसांमध्ये त्यांच्या प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.

गुरुवारी सकाळी ९ वाजता अजित पवार पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर श्रेयस पॅलेस मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कल्याणराव काळे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून राज्य पातळीवर काही वेगवान घडामोडी घडत आहेत.

हर्षवर्धन पाटलांकडून काळेंची मनधरणी

भाजपचे नेते व सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे भाजप सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. काळेंनी भाजप सोडू नये, त्यांच्या अडचणी भविष्यात सोडविण्याचे आश्वासन देत भाजपकडून माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत. या नेत्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशीही चर्चा घडवून आणली आहे. मात्र काळे राष्ट्रवादी प्रवेशावर ठाम आहेत. म्हणून भाजपने शेवटचा प्रयत्न म्हणून काळेंचे निकटवर्तीय व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामार्फत भेट घेऊन काळेंना थांबविण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी सकाळी काळे यांची भेट घेऊन पक्ष न सोडण्याची विनंती केली. मात्र काळे पक्ष प्रवेशावर ठाम राहिले आहेत.

Web Title: Ajitdada in Pandharpur today; I will stay for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.