कुशल संघटकाची अकाली ‘एक्झिट’

By admin | Published: July 21, 2014 01:32 AM2014-07-21T01:32:46+5:302014-07-21T01:32:46+5:30

सुभाष पाटलांचा अपघाती मृत्यू : युवकांना चटका लावणारा

Akali 'Exit' of a skilled organization | कुशल संघटकाची अकाली ‘एक्झिट’

कुशल संघटकाची अकाली ‘एक्झिट’

Next


सोलापूर : राजकारणाची वाटच खडतर...इथे प्रत्येक पाऊल सावधपणाने टाकावे लागते, प्रवासही सावधपणेच करावा लागतो. या खडतर वाटेने जसा श्रीकांत जिचकरांचा बळी घेतला, तसे गोपीनाथ मुंडेंनाही आपल्यातून हिरावून नेले... सुभाष पाटील तितक्या उंचीवर पोहोचलेले नेते नसतीलही; पण त्यांची महत्त्वाकांक्षा आणि नैसर्गिक नेतृत्वगुण त्यांची धडपड थांबवू शकत नव्हते. आपल्या नेत्याला अर्थात नारायण राणे यांना साथ देण्यासाठी कणकवलीच्या मेळाव्यासाठी गेलेल्या पाटलांचा मात्र असाच राजकारणाच्या वाटेवर अपघाती मृत्यू झाला....एका कुशल संघटकाला सोलापूर जिल्हा कायमचा मुकला. त्यांच्या या अकाली एक्झिटने सर्वांच्या मनाला चटका लावला.
सुभाष पाटील यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आपला राजकीय प्रवास सुरू केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ते चाहते होते. राज ठाकरे यांच्याविषयीही त्यांना तितकेच आकर्षण होते. मनसेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राज यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मनसे शहराध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात त्यांची घुसमट सुरू झाल्याने त्यांनी पक्षत्याग केला अन् नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेत काम सुरू केले. शहर संघटक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची राज्यात प्रशंसा झाली. त्यामुळेच राणे यांनी त्यांच्यावर प्रदेश संघटकपदाची धुरा सोपविली.
सोलापुरातील बेरोजगारी ही नेहमीच सुभाष पाटील यांना खुपत होती. येथील तरूणाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, तो स्वयंपूर्ण असला पाहिजे, यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. राज्यभरातील नामांकित उद्योग कंपन्यांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या मेळाव्याद्वारे १० हजार १२० तरूणांना एकाच दिवशी रोजगाराची संधी दिली... एकाच दिवशी नियुक्तीपत्रे दिली. त्यानंतर शिवाजी वर्क्स लिमिटेड अर्थात शिवशाही या कंपनीच्या कामगार संघटनेचे नेतृत्व पाटील यांच्याकडे चालून आले. येथील कामगारांचा व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू होता. सुभाष पाटील यांनी समन्वय साधून कामगारांना न्याय मिळवून दिला. बांधकाम क्षेत्रातही त्यांनी अल्पावधीत नाव कमाविले.
---------------------------
सोन्याचा सोस
सुभाष पाटील यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत देखणे होते. त्यांना सोन्याच्या दागिन्याची अतिशय आवड होती. त्यांच्या मनगटात सोन्याचं कडं आणि गळ्यात जाडजूड सोन्याची चेन असे. या दागिन्यांमुळे त्यांचे देखणेपण अधिक खुलून दिसे. सोलापूरचे ‘गोल्डमॅन’ म्हणूनही त्यांना ओळखले जायचे.

Web Title: Akali 'Exit' of a skilled organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.