अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा गैरकारभार; पत्रकारावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:59 AM2020-01-30T01:59:00+5:302020-01-30T01:59:16+5:30
हरवाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागवली होती.
सोलापूर : अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागविल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून खुनीहल्ला केल्याप्रकरणी जन्मेजय भोसले, अमोलराजे भोसले यांच्यासह अकरा जणांविरूद्ध अॅट्रॉसिटीअन्वये अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जन्मेजय भोसले, अमोलराजे भोसले, बाळासाहेब सोमनाथ पोळ (वय ४०), नितीन शिंदे, गोट्या माने, सनी सोनटक्के, गणेश भोसले, पिंटू साठे, स्वप्निल मोरे, गोविंद शिंदे (सर्व रा. अक्कलकोट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, यामध्ये अन्य तीन अनोळखी लोकांचा समावेश आहे. पत्रकार स्वामीनाथ यशवंत हरवाळकर (४९, अक्कलकोट) हे शिक्षक असून, ते सोशल मीडियावर पत्रकार म्हणून काम करतात. हरवाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागवली होती. त्यानंतर इन्कम टॅक्स, ईडी व विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तेव्हापासून जन्मेजय भोसले व अमोलराजे भोसले हे त्यांच्यावर चिडून होते.
बुधवारी हरवाळकर यांना नितीन शिंद,े बाळू पोळ यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत अन्नछत्र मंडळाच्या विरूद्ध बातमी दिली का? जन्मेजय भोसले व अमोलराजे भोसले यांच्या विरूद्ध तक्रार करतो काय? असे म्हणत तुला खलास करायला सांगितले आहे, असे बोलत हॉकीस्टीकने मारहाण केली. इतर आरोपींनी काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हरवाळकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
दरम्यान हरवाळकर यांनी चाकूने वार केला व गळ्यातील लॉकेट व हातातील अंगठी काढून घेतली, अशी फिर्याद आरोपी पोळ याने दिली आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.