आखाडा सोशल मीडियातला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:57 AM2019-04-20T10:57:52+5:302019-04-20T10:58:10+5:30

खरं तर आपली राजकीय मते समाजमाध्यमांवर टाकण्याचा आपला अधिकार असला तरी दुसºयांची मतं पचवण्याची परिपक्वता हे समाजमाध्यम वापरताना आली पाहिजे.

Akhada Social Media! | आखाडा सोशल मीडियातला ! 

आखाडा सोशल मीडियातला ! 

Next

परवा एका प्राध्यापक मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो. अर्थातच गप्पांच्या ओघात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सुरू असलेल्या निवडणूक उत्सवावर गाडी येऊन थांबली. माझ्या मित्राने त्याच्या एका बºयापैकी मैत्री असलेल्या वरिष्ठ प्राध्यापकाने पाठवलेला मेसेज दाखवला. ‘ प्रिय मित्रा, अलीकडे तू अमूक पक्षाच्या समर्थनार्थ जास्त पोस्ट टाकत असल्यामुळे निवडणूक होईपर्यंत तुला फ्रेंड लिस्टमधून रिमूव्ह करतोय’ असा तो मेसेज होता. 

मला खूप हसू आलं आणि सखेद आश्चर्यही वाटलं़ कारण प्राध्यापक महाशय राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत़ आता राज्यशास्त्राच्या प्राध्यापकासारखी व्यक्ती राजकारण इतके ‘वैयक्तिक’ घेत असेल तर इतर सामान्य लोकांच्या मानसिकतेची कल्पनाच न केलेली बरी. एखादी राजकीय पोस्ट फेसबुक,व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्यावर त्यावर तुमचेच परममित्र विरोधी सूर लावत असतील, त्याची खिल्ली उडवत असतील अशा प्रकारचे ‘ट्रोलिंग’ आपल्यापैकी बºयाच जणांनी अनुभवलं असेल.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातील या मतप्रदर्शनामुळे खºया आयुष्यात मतभेद होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादी व्यक्ती आपले राजकीय विचार व्यक्त करते तर राजकीय मतभेद असणाºया त्याच्या मित्र-मैत्रिणींनी समाजमाध्यमांवर छेडलेल्या वादामुळे प्रत्यक्षातील नाती दुभंगणंही सुरू झाले आहे. त्यातून एकमेकांना ब्लॉक करणं,अनफ्रेंड करणं, विरोधी कमेंट करणं, शेरेबाजी करणं हे सुरू होतं. यातून इतर लोकांचंही फुकट मनोरंजन होतं. एरवी रस्त्यावर एखादं भांडण किंवा अपघात झाला तर जशी बघ्यांची गर्दी जमते तशीच ती गर्दी इथंही जमते आणि ती तशी पसारही होते.

खरं तर आपली राजकीय मते समाजमाध्यमांवर टाकण्याचा आपला अधिकार असला तरी दुसºयांची मतं पचवण्याची परिपक्वता हे समाजमाध्यम वापरताना आली पाहिजे. परिपक्वता नसेल तर असे ‘ट्रोलभैरव’ उच्छाद मांडतात आणि मग सुरु होतो ‘ट्रोलवाट्रोलवी’चा खेळ. यातील जो समंजस, संवेदनशील असतो त्याला ‘आपण आपली मते व्यक्त करावीत की नको, व्यक्त केली तर आपल्याला ट्रोल केले जाईल’ किंवा आपले मित्र आपल्याला अनफ्रेंड करतील, रिलेशन खराब होतील ही भीती सतावत असते. 

नुकताच ‘इपसोस’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात सोशल नेटवर्कवरील राजकीय मतभेदांमुळे नात्यात, मैत्रीत कटुता जगभर वाढीस लागल्याचं हे सर्वेक्षण सांगतं. हे प्रमाण जिथे इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरलं जातं अशा शहरी भागात प्रामुख्याने तरुणांमध्ये जास्त आहे. अगदी दहावी पास झालेल्या तरुणांपासून ते उच्चविद्याविभूषित लोकसुद्धा राजकीय मतं ‘पर्सनली’ घेतात़ निवडणुका येतील, जातील, एखादा पक्ष जिंकेल किंवा हरेल पण म्हणून आपल्याच मित्रांच्या गोतावळ्यात वितुष्ट आणणं हे निरोगी नात्यांचं लक्षण नाहीये.
यावर उपाय काय?

रागाच्या भरात काही जण अनफ्रेंड/ब्लॉक करतात. काहीजण नाती तोडतात,परंतु हा काही उपाय होऊ शकत नाही. काहीजण याला तितक्याच खोचकपणे,तिरकसपणे उत्तर देतात. याला ‘सोशल नेटवर्किंग’च्या दुनियेत उपहासात्मक पद्धतीने तोडीस तोड उत्तर देऊन समोरच्याला शांत करणे तेही संयमीपणे शब्द वापरून. आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्या पोस्टवर विरोधी कमेंट आली तरी त्याला वाचून सोडून देणे त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका न घेणे. पण मित्रांनो खरंच या सर्वांची गरज आहे का? लोकशाहीने बहाल केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा वापर समाजमाध्यमांवर करताना नक्कीच भान बाळगले पाहिजे़ सोशल नेटवर्किंगवर ‘सोसंल’ एवढंच बोललं आणि वाचलं पाहिजे. यातून वाद टाळून संवादाचा मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी आभासी जगातील वाद-विवाद,मतभेद आपल्या सुंदर नात्यांमध्ये काटे तर बनत नाहीयेत ना एवढा विचार केला तरी पुरेसे आहे. 
- प्रा. रवींद्र देशमुख
(लेखक हे कम्युनिकेशन स्किल्स अभ्यासक आहेत.)

Web Title: Akhada Social Media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.