दुर्दैवी! एव्हरेस्ट सर करून माघारी परतताना अकलूजच्या गिर्यारोहकाचा मृत्यू
By Appasaheb.patil | Published: May 24, 2019 02:35 PM2019-05-24T14:35:10+5:302019-05-24T15:06:33+5:30
भारत सरकार कडून मृतदेह खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू
सोलापूर : एव्हरेस्ट सर करणारा अकलूजचा गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट कॅम्प-4 (26000 फूट) वर अति थकव्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूबद्दल नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' यांनी माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला निहाल याच कंपनीबरोबर एव्हरेस्ट चढाई मोहिमेवर गेला होता.
23 मे रोजी सकाळी 8.30 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर निहाल व त्याच्या शेर्पाने खाली उतरण्यास सुरवात केली. एकाच दिवशी जगभरातील 200 पेक्षा जास्त गिर्यारोहक चढाई करत असल्यामुळे अनेक वेळा जाम होऊन प्रत्येक गिर्यारोहकाला खूप वेळ थांबावे लागत होते. अश्यातच अतिशय थकव्यामुळे कॅम्प-4 येथे पोहचून निहाल बागवान याने शेवटचा श्वास घेतला अशी माहिती नेपाळ येथील कंपनी 'पिक प्रमोशन प्रा. लि.' चे केशव पुडीया यांनी दिली.
भारत सरकारकडून मृतदेह खाली
आणण्यासाठी प्रयत्न
भारत सरकार कडून निहाल बागवान याचा मृतदेह एव्हरेस्ट कॅम्प 4 पासून खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याबद्दल एक मोहीम आखली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.